


छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्कीतून तांब्याची तार चोरीसाठी आलेल्या १५ ते २० जणांच्या टोळक्यांवर सुरक्षारक्षकाने रात्री दीड ते दोनच्या सुमारास केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. मृत चोर धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. चोरांनी तलवार आणि चाकूसह पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. त्यांनी दगडफेकही केल्याने नाईलाजाने गोळीबार करावा लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेमुळे बीड, धाराशिव जिल्ह्यात उद्योजकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी महिनाभरापूर्वी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. या वेळी पवन ऊर्जा प्रकल्पांमधील लोखंडी साहित्य आणि तांब्याच्या तारा चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे सांगण्यात आले होते. अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवा, सुरक्षारक्षक नेमा, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतरही चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नेकनूर पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रसाद गोसावी म्हणाले की, ‘ओटू’ या कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबातील तांब्याची तार काढण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांवर ‘ओटू ’ सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी रुपसिंग टाक यांनी गोळीबार केला. १५ ते २० जणांच्या समूहातील काही जण त्यांच्या अंगावर तलवारी व चाकू घेऊन येत होते. काहींनी दगडफेक केली. त्यामुळे गोळीबार करावा लागल्याची फिर्याद सुरक्षारक्षकाने दिली आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क झाला आहे. आरोपीची ओळख पटवणे बाकी आहे. मात्र, हे सारेजण धाराशिव जिल्ह्यातील आहेत.’
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘गोळीबारातील व्यक्ती मृत झाला आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. या पूर्वीही पवनचक्कीतून तांब्याची वायर चोरी करण्याचे प्रकार घडले असल्याचे उद्योजक सांगत आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुंबई : पूर्व – मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याचबरोबर वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणातील काही ठिकाणी शुक्रवारीही मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकरण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या प्रणालीमुळे कोकण किनारपट्टीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, उत्तर तेलंगणा ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुंबईत शुक्रवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. मात्र, दिवसभर उष्ण व दमट वातावरणामुळे मुंबईकर हैराण झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारीही मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, सुधारीत अंदाजानुसार शनिवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. यावेळी काही ठिकाणी सोसाट्याचा वारा असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गडगडाटासह पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव.
अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर, बुलढाणा, यवतमाळ.
हलक्या सरींचा अंदाज
धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली , जालना, छत्रपती संभाजीनगर.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नैऋत्य मोसमी वारे शुक्रवारीही एकाच जागी होते. मागील दोन दिवसांपासून मोसमी वारे त्याच भागात रेंगाळत आहेत. मात्र, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने पुढील एक ते दोन दिवसांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मोसमी वारे प्रगती करतील. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापतील. तसेच लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमधील काही भागांतही मोसमी वारे दाखल होतील. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे वाटचाल करतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mini Kashmir of India: काश्मीर हे असे ठिकाण आहे ज्याच्या सौंदर्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लोक आता तिथे जाण्यास कचरत आहेत. जर तुम्हीही या कारणास्तव सध्या काश्मीरला जात नसाल तर पश्चात्ताप करू नका. कारण तुमच्याकडे ‘मिनी काश्मीर’चा पर्याय आहे. हो, उत्तराखंडमध्ये एक असे ठिकाण आहे जे सौंदर्याच्या बाबतीत काश्मीरशी स्पर्धा करते. म्हणूनच त्याला ‘मिनी काश्मीर’ असं देखील म्हणतात. मे ते जून हा काळ येथे भेट देण्यासाठी खूप चांगला मानला जातो. ऑफिसमध्ये सुट्टी टाकून तुम्ही मिनी काश्मीरमध्ये जाऊ शकता आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
आपण मुनस्यारीबद्दल बोलत आहोत, हे उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यात असलेले एक अतिशय सुंदर गाव आहे. त्याला ‘मिनी काश्मीर’ म्हणतात. ते तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण असू शकते. सुमारे २२०० मीटर उंचीवर असलेले हे हिल स्टेशन पंचचुली पर्वतरांगा आणि नंदा देवी पर्वताच्या सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बर्फाच्छादित हिमालयीन पर्वतरांगांचा आनंद घेऊ शकता.
मुनस्यारी येथे आजूबाजूला पाहण्यासारखे खूप काही आहे. तुम्ही येथे आल्यावर पंचचुली (मुन्सियारीवरून दिसणारी पाच बर्फाळ शिखरे), नंदा देवी मंदिर, माहेश्वरी कुंड, बेतुलीधर, खलिया टॉप, बिर्थी फॉल्स, असकोट अभयारण्य इत्यादी विविध ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. यासोबतच येथे ट्रेकिंग आणि साहसी खेळदेखील बरेच आहेत. येथे मिलम ग्लेशियर ट्रेक, खालिया टॉप ट्रेक आणि नामिक ग्लेशियर ट्रेकसारखे रोमांचक ट्रेक आहेत. मे-जूनमध्ये बर्फ वितळू लागतो ज्यामुळे ट्रेकिंगचे मार्ग मोकळे होतात.
या गावात तुम्ही वर्षभर अद्भुत हवामानाचा आनंद घेऊ शकता आणि पंचचुली (पाच शिखरे), नंदा देवी आणि नंदा कोट यांचे नेत्रदीपक दृश्य पाहू शकता. पण मे-जून हा हंगाम येथे भेट देण्यासाठी सर्वात परिपूर्ण मानला जातो. याचे कारण म्हणजे मे-जून महिन्यात मुनस्यारीचे हवामान खूप आल्हाददायक असते. यावेळी येथील तापमान 10°C ते 25°C दरम्यान असते. ही वेळ भेट देण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी योग्य आहे.




नवी मुंबई: सट्टा बाजारात आमच्या मार्गदर्शखाली पैसे गुंतवा कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा, किंवा आमच्या व्हिडीओला लाईक कमेंट करा आणि पैसे कमवा अशा फसव्या जाहिरातींना बळी पडून रोज कोट्यवधी रुपयांची फसवणूक समोर येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल वर जनजागृतीतपर कॉलर ट्यून लावली तरीही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार नवी मुंबईत घडला असून एका व्यक्तीने सट्टा बाजारासाठी २७ लाख २५ हजार ८७० रुपये गुंतवले मात्र एक छदाम त्यांना परतवा मिळाला नाही आणि गुंतवणूक रक्कमदेखील परत मिळाली नाही.
यातील फिर्यादी हे नवी मुंबईतील नेरुळ येथे आर्मी कॉलनीत राहणारे एक जेष्ठ नागरिक आहेत. सट्टा बाजारात पैसे गुंतवा आणि कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा अशा आशयाची जाहिरात त्यांनी समाज माध्यमात पहिली. त्यावर क्लीक केले असता त्यांचा समावेश एका व्हॉटसअॅप समूहात झाला ज्याचे अॅडमिन दिव्यांगांना थोरात नावाच्या महिला होत्या.
तेथे अप स्टॉक्स नावाचे अॅप डाऊन लोड करण्यास सांगितल्या प्रमाणे फिर्यादी यांनी केले त्या द्वारे विविध पाच जणांनी सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक केली. त्याचे पैसे संशयित व्यक्तींनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यात वळते केले. अॅप वर भरघोस परतवा दिसत होता मात्र फिर्यादी यांच्या खात्यात वळती होत नव्हता.
४ मे ते १४ मे या दहा दिवसात फिर्यादी यांनी २७ लाख २५ हजार ८७० रुपये गुंतवले मात्र एक रुपयादेखील त्यांना परतवा मिळाला नाही आणि गुंतवणूक रक्कम हि परत मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी गुरुवारी नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

बंगळुरुस्थित तंत्रज्ञान कंपनीच्या संस्थापकाने आपलं कंपनीचं ऑफिस पुण्याचा हलवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त सहा महिन्यातच कंपनीने बंगळुरुमधील कार्यालय बंद करण्याचं ठरवलं आहे. भाषेवरुन सुरु असलेला मूर्खपणा यासाठी कारणीभूत असल्याचं संस्थापकाने पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
“जर भाषेचा हा मूर्खपणा असाच सुरु राहिला तर मला माझे गैर-कन्नड भाषिक कर्मचारी पुढील ‘बळी’ ठरावेत अशी इच्छा नाही,” असं उद्योजक कौशिक मुखर्जी यांनी एक्सवर लिहिलं आहे. माझअया कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, आपण त्यांच्याशी [दृष्टिकोनाशी] सहमत आहेत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Today I took a decision to wind up our Bangalore office in the next 6 months and move it to Pune. If this language nonsense is to continue, I do not want my non Kannada speaking staff to be the next “victim”.
This idea was mooted by the staff themselves.
I agreed to their POV. https://t.co/M9abD2OYOD— Kaushik Mukherjee (@kush07) May 22, 2025
बंगळुरुच्या चांदापुरा भागातील एसबीआय शाखेत घडलेल्या एका प्रकारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेतील एका मॅनेजरने एका ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला आणि म्हटलं, “हा भारत आहे, मी कन्नड नाही तर हिंदी बोलेन”. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर कन्नड कार्यकर्त्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडूनही त्यावर तीव्र टीका झाली.
बंगळुरुमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी हा व्हिडीओ शेअऱ करत हे वागणं स्विकारलं जाऊ शकत नाही असं मह्टलं होतं. या पोस्टला उत्तर देताना कौशिक मुखर्जी यांनी ऑफिस पुण्याला नेत असल्याचं जाहीर केलं आहे.
“जर तुम्ही कर्नाटकात ग्राहक सेवेचं काम करत असाल, विशेषतः बँकिंगसारख्या क्षेत्रात, तर ग्राहकांना त्यांच्या भाषेत संवाद साधणे महत्वाचे आहे,” असं सूर्या यांनी म्हटलं. कर्नाटकातील बँका आणि इतर सार्वजनिक संस्थांनी स्थानिक भाषा बोलणारे कर्मचारी नियुक्त करावेत अशी त्यांची दीर्घकाळची मागणी त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मांडली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही एसबीआयमधील घटनेवर टीका केली होती. तसंच मॅनजेरचं वर्तन निषेधार्ह असल्याचे म्हटलं. त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाला देशभरातील बँकिंग कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक आणि भाषा संवेदनशीलता प्रशिक्षण लागू करण्याची विनंती केली. दरम्यान या घटेननंतर मॅनेजरची बदली करण्यात आली आहे. बँक आणि मॅनेजीर दोघांनीही माफी मागितली आहे.
