


India, Pakistan China Relations : पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर या सैन्य कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला. याच परिस्थितीवर भाष्य करत अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्था (DIA) नं 2025 या वर्षासाठी सादर केलेल्या अहवालात भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या अहवालानुसार, पाकिस्तान भारताला ‘अस्तित्वासाठी एक धोका’ मानत आहे. तर भारत, चीनला आपला ‘मुख्य विरोधक’ आणि पाकिस्तानला एक ‘सहायक सुरक्षा समस्या’ या दृष्टीकोनातून पाहतोय.
अमेरिकेच्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला सध्या संघर्षविराम लागला असला तरीही पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना मिळणारा पाठिंबा आणि भारताकडून त्याचा प्रतिकार करण्यासाठी होणारी सैन्य कारवाई भविष्यातील धोक्याला कारणीभूत ठरू शकते. परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही हेच अमेरिकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अमेरिकी गुप्तचर यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात चीनला अमेरिकेसमोरचा सर्वात मोठा लष्करी आणि सायबर धोका म्हणून वर्णन करण्यात आलं असून या अहवालात इराण, उत्तर कोरिया, चीन आणि रशिया हे चार देश एकत्र येऊन अमेरिकेविरोधात राजकीय मोहिम राबवत आहेत असंही नमूद करण्यात आलं आहे.
सध्याच्या घडीला चीनशी लढा देणं, भारताचं वैश्विक नेतृत्त्वं करणं आणि भारताच्या लष्कराला सर्वतोपरि ताकद देऊ करणं या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यस्थानी असल्याचं अमेरिकेच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे.
सदर अहवालामध्ये पाकिस्तानची सैन्यस्थिती आणि चीनकडून मिळणारी लष्करी मदत यावरही कटाक्ष टाकण्यात आला असून, पाकिस्तानकडून सातत्यानं आण्विक शस्त्रसाठा वाढवण्यावर भर दिला जात असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. चीनकडून पाकिस्तान लष्करी आणि आर्थिक मदत घेत असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं असून चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यामुळं भारतीय सीमासंघर्षाचा तणाव आणखी वाढू शकतो ही वस्तूस्थिती नाकारता येत नसल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.



ठाणे : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना लागून असलेल्या औद्योगिक पट्ट्यात माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना बळ देण्यासाठी यापूर्वी आरक्षित असलेल्या आयटी पार्कच्या जमिनींचा यापुढे विस्तारित स्वरूपात वापर बदल करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तयार केला आहे. यानुसार आयटी उद्योगांच्या जागांवर यापुढे घरे, व्यापारी, शैक्षणिक संकुले तसेच इतर व्यापारी सुविधांचा विस्तार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
यापूर्वी मुंबई महानगर तसेच पुणे महानगर प्रदेशात आयटी उद्योगांसाठी आरक्षित भूखंडांवर २० टक्क्यांच्या प्रमाणात अशा प्रकारे वापर बदल करणे शक्य होते. या नव्या प्रस्तावानुसार ४० टक्क्यांपर्यंत ही सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘आयटी पार्क’ना खेटून मॉल, चित्रपटगृहे, गगनचुंबी निवासी, व्यापारी संकुले यापुढे अधिक संख्येने उभी राहू शकतील.
महाराष्ट्रात मरोळ, ठाणे (वागळे), ठाणे-बेलापूर औद्योगिक विभाग (नवी मुंबई), डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, हिंगणा, अंबाड, सात्रपूर, चिखलठाणा ही काही जुनी औद्योगिक क्षेत्रे आहेत. मुंबई महानगर प्रदेशात आणि विशेषत: ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात देशातील काही बड्या उद्योग समूहांनी माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांसाठी शेकडो एकर जमीन खरेदी केली असून यापूर्वीच एमआयडीसीच्या धोरणानुसार या जागेवर वापर बदल सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील नोसिलसारख्या रासायनिक कंपन्यांच्या जागांवर मोठे आयटी पार्क आणि त्यालगत गगनचुंबी निवासी, व्यापारी संकुले, मॉल, मल्टिप्लेक्सेस दिसू लागली आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातही आता आयटी पार्कलगत व्यापारी संकुले उभी राहिली आहेत.
गेल्या काही वर्षांत मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात आयटी, बायोटेक्नोलॉजी, लॉजिस्टिक पार्क तसेच इलेक्ट्रॉनिक क्लस्टर यांसारख्या उद्योगांची चर्चा सुरू असताना या सेवा उद्याोगांना समर्थन सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचा एमआयडीसी व्यवस्थापनाचा दावा आहे.
त्यामुळे औद्योगिक आणि विशेषत: आयटी भूखंडांवरील समर्थन (सर्व्हिस) उपयोगाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने तयार केला आहे. आयटी भूखंडांवर वापर बदलाचे प्रमाण वाढवावे अशा स्वरूपाची मागणी काही उद्योग समूहांकडून पुढे आली होती.
आयटी, डेटा सेंटर्स, फिनटेक, लॉजिस्टिक, गोदाम आधारित उद्योगांना लागून या निवासी आणि व्यावसायिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी यापुढे ४० टक्क्यांपर्यत अशा सुविधांची परवानगी देण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने घेतला आहे. मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात आयटी उद्योगांच्या जमीन वापराचे प्रमाण ६० टक्के तर इतर वापर ४० टक्क्यांपर्यत खुला केला जाणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी हे प्रमाण ७०:३० प्रमाणात असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विश्वविद्यालयांची स्थापना, वाढता व्यापार, त्यामुळे श्रमिकवर्गाच्या पोटातून जन्मलेला नागरी मध्यमवर्ग, या मध्ययुगातल्या सत्तारूढ संदर्भबिंदूला धक्का देणाऱ्या बाबी होत्या…
मनुष्य फक्त चयापचयापुरता मर्यादित राहणारा प्राणी नसून तो सतत निसर्गानं घालून दिलेल्या मर्यादांना ओलांडण्याचा प्रयत्न करत असतो. कधी निसर्गाचं अनुकरण तर कधी त्यावर मात करून बौद्धिक क्षमतांना आविष्कृत करण्याचा प्रयत्न माणूस करतो. त्यामुळे कालौघात मनुष्याने त्याच्या अस्तित्वाची, स्वातंत्र्याची आणि अतिरेकाची ठळक नोंद म्हणून टेक्नोस्फिअर निर्माण केलं आहे. टेक्नोस्फिअर म्हणजे मानवनिर्मित वस्तूंचा आणि वास्तूंचा ऐतिहासिक थर. उत्क्रांतीत जीवसृष्टीतल्या इतर प्राण्यांच्या मूलभूत गरजांमध्ये आणि त्यांच्या पूर्ततेच्या पद्धतीत ‘जाणीवपूर्वक’ बदल झालेला आढळत नाही. मात्र मनुष्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबतच इतर कृत्रिम गरजांमध्ये वाढ होऊन त्यांचं स्वरूप बदलत गेलं आहे.
आधुनिक ज्ञानव्यवहारात टेक्नॉलॉजी आणि आर्ट या शब्दांमध्ये फरक केला जात असला तरी प्राचीन काळी या दोन्ही शब्दांच्या अर्थांमध्ये बरीच साम्यं होती. खरंतर, आर्ट हा लॅटिन शब्द टेक्ने या ग्रीक शब्दाचा अनुवाद आहे. टेक्ने (Techne) या ग्रीक शब्दाचा अर्थ कला, कौशल्य, कारागिरी, तंत्र असा होतो आणि आर्ट शब्दापासून आर्टिझन, आर्टिफिशियल सारखे शब्द बनलेले आहेत. विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती मनुष्याच्या मूलभूत बौद्धिक क्षमता समजल्या जातात आणि या क्षमतांच्या प्रकटीकरणाच्या प्रक्रियेला टेक्ने हा शब्द लागू होतो. आजच्या काळात टेक्ने शब्दात अनुस्यूत बुद्धी आणि श्रम यांतली फारकत प्राचीन काळी नव्हती. कारण यांत्रिकपणे होणाऱ्या कृतींच्या मुळाशीही विचार, कल्पकता, आठवणी आणि स्वप्नं दडलेली असतात. फरक एवढाच की यांत्रिक कृतींच्या मुळाशी असणाऱ्या बौद्धिक ढाच्याचा बहुधा विसर पडतो. त्यामुळे अशा यांत्रिक कृतींचं अवमूल्यन होऊन त्यांना फक्त बुद्धिहीन श्रमाचा दर्जा दिला जातो.
इथवरच्या विवेचनात मनुष्याच्या मूलभूत बौद्धिक क्षमतांच्या ऐतिहासिक प्रकटीकरणाची चर्चा करताना ‘मनुष्य’ या एकवचनी अमूर्त आणि दिक्कालातीत संकल्पनेचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र मूर्त स्वरूपात आपल्याला माणसांचं बहुजिनसी आणि विषम समाजवास्तव नजरेस पडतं. मोजक्यांनाच बौद्धिक क्षमतांचे धनी; तर बहुतेकांना ‘बुद्धिहीन यांत्रिक श्रमा’च्या पात्रतेचं समजलं जातं. त्यामुळे तत्त्वत: प्रत्येक मनुष्याच्या ठायी बौद्धिक क्षमता आणि त्यांना आविष्कृत करण्याची प्रवृत्ती गृहीत धरली असली तरी वास्तवात कुठल्याही ऐतिहासिक टेक्नोस्फिअरचं विश्लेषण केलं तर त्यात समग्र समाजाचा विचार, कल्पकता, आठवणी आणि स्वप्नं हे सारं आविष्कृत झालेलं दिसत नाही. त्यात सत्तारूढ संदर्भबिंदूला पूरक अशाच बौद्धिक आणि सांस्कृतिक ढाच्याच्या प्रकटीकरणाला प्राधान्य दिलं जातं. पण कुठल्याही सत्तारूढ संदर्भबिंदूचं सत्तास्थान पूर्णत: सुरक्षित नसतं. बंडखोर विविधतेत ( diversité rebelle) स्पर्धक संदर्भबिंदू दडलेले असल्यानं कुठल्याही काळाचं टेक्नोस्फिअर हे पूर्णत: एकजिनसी आढळत नाही. कुठल्याही काळात टेक्नोस्फिअर फक्त त्याच काळाचं आणि स्थळाचं अपत्य नसून त्यात आदिम काळापासूनच्या मानवी स्वातंत्र्याच्या खाणाखुणा टिकून राहतात. त्यामुळे आपण पद्धतीशास्त्राचा भाग म्हणून काळाची विभागणी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी करत असलो तरी एका पातळीवर आपण एकाच वेळी सर्वकालिकही असतो. या लेखात मध्ययुगाच्या बदलत्या टेक्नोस्फिअरची संक्षिप्त चर्चा करून त्यातल्या आधुनिकतेच्या ठिणग्या, पाऊलखुणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
मध्ययुगाचं वर्णन लोकसाहित्यात ‘कॅथेड्रलयुग’ म्हणूनसुद्धा केलं जातं. विशेषकरून १२व्या शतकानंतर धर्मयुद्धांच्या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य जगात गगनचुंबी कॅथेड्रल निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली होती. ईश्वरप्रेम आणि ईश्वरसेवा मध्ययुगीन जीवनाचा सत्तारूढ संदर्भबिंदू असल्याने मोठ्या नगरांपासून छोट्या वस्तींपर्यंत प्रत्येक ठिकाणी चर्च आणि तत्सम धार्मिक वास्तू उभारणं अनिवार्य होतं. त्यासाठी ‘शास्त्रोक्त’ कल्पना शोधून मोठ्या प्रमाणात निधी उभारला गेला. स्वर्ग/ नरकापलीकडे जाऊन आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी ‘पर्गेटरी’ ही कल्पना शोधून काढण्यात आली. नियमितपणे पापांची कबुली देणं धार्मिक कर्तव्य होतं. कुणाला किती काळ पर्गेटरीत जळत आणि तळत ठेवायचं हा सर्वस्वी पुरोहितांचा शास्त्रोक्त अधिकार होता. पापांची कबुली देणाऱ्या लोकांना पुरोहित वर्ग ‘ billets d’ indulgences’ अर्थात पापमुक्तीचे तिकीट विकून अफाट संपत्ती जमा करत होता. दुसऱ्या बाजूला राज्यकर्ता उमराववर्गसुद्धा धार्मिक वास्तू बांधण्यात आघाडीवर होता. उमराव वर्गाला ईश्वरेच्छेप्रमाणे राज्य करण्याचा शास्त्रोक्त अधिकार चर्चकडून प्राप्त होत असल्यानं लोकांच्या मूलभूत गरजांपेक्षा चर्चच्या धार्मिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून देणं राज्यकर्त्यांना अधिक श्रेयस्कर आणि फायदेशीर ठरत असे. खरंतर हा सत्ता टिकवून ठेवण्याचा राजमार्ग होता. इथं नमूद करणं आवश्यक आहे की उच्चपदस्थ पुरोहितवर्ग आणि राज्यकर्तावर्ग एकाच अर्थात उमराववर्गातून येत असत. थोडक्यात, मध्ययुगात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवन चर्चच्या भव्य वास्तूंभोवती आकार घेत असे. त्यामुळे सत्तारूढ (पुरोहित आणि उमराव) वर्गाला पूरक वस्तू आणि वास्तूंची निर्मिती करून त्यांच्या सत्तेच्या पुनर्निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्यामुळे सत्तारूढ वर्गाच्या विचार/ कल्पना/ आठवणींच्या प्रकटीकरणासाठी संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला मात्र बहुसंख्याक श्रमिक शोषित समाजाचं अवमूल्यन होऊन अदृश्यीकरण करण्यात येत होतं.
तेराव्या शतकापासून मात्र मध्ययुगीन अवकाशात धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या पारंपरिक वास्तूंना आधुनिक स्पर्धक निर्माण होतात. नागरीकरण, विश्वविद्यालयांची निर्मिती, शहरी बाजारपेठांची वाढ व त्याभोवती वास्तव्य करणाऱ्या बूर्ज्वा अर्थात नागरी मध्यमवर्गाचा उदय याच काळात होतो. त्यामुळे पुरोहित , उमराव वर्गाच्या मक्तेदारीला तडा जातो. या ऐतिहासिक प्रक्रियेचं प्रतिबिंब तत्कालीन टेक्नोस्फिअरमधल्या स्थित्यंतरांत दिसतं. १९व्या शतकातला प्रख्यात फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगोनं ‘नोत्र दाम द पॅरिस’ या कादंबरीत मध्ययुगातला हा ऐतिहासिक बदल सूक्ष्मपणे टिपला आहे.
आधुनिक युगाचे स्तंभ समजल्या जाणाऱ्या पॅरिस सोर्बोन, ऑक्सफर्ड, केंब्रिज, सालामान्का, मोंपेलिए, बोलोनिया सारख्या जवळपास ६० विश्वविद्यालयांचा जन्म मध्ययुगात झाला आहे. कालौघात आधुनिकतेला आणि तत्त्वत: सगळ्यांच्या बौद्धिक क्षमतांना वाट करून देणाऱ्या या वास्तू मध्ययुगीन टेक्नोस्फिअरमध्ये का आणि कशा अस्तित्वात येतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. याआधी नमूद केल्याप्रमाणे १२व्या शतकात नागरीकरणाच्या प्रक्रियेसह सामाजिक गरजांतही वाढ होते. त्यांच्या पूर्तीसाठी अनेकविध खासगी व्यवसाय उदयास येतात. ज्ञानव्यवहारसुद्धा एक खासगी व्यवसाय म्हणून मान्यता पावतो. याच काळात शिक्षणाच्या धर्मनिरपेक्षीकरणाला सुरुवात होते. त्यामुळे कॅथोलिक चर्चची ज्ञानव्यवहारावरची पकड सैल होते. पिएर आबेलारसारखे अनेक शिक्षक धर्मशास्त्र आणि लिबरल आर्टस्मध्ये पारंगत असल्यानं एकाच वेळी ते धार्मिक आणि लौकिक क्षेत्रात अध्यापन करतात. अशा शिक्षकांभोवती मध्ययुगात नागरी शाळांची ( urban schools) संख्या वाढते. या संख्यात्मक वाढीबरोबर ज्ञान क्षेत्राचा विस्तार होऊन गुणात्मक वाढदेखील होते.
१२व्या शतकातल्या नागरी शाळा म्हणजे एखाद्या विषयात पारंगत असलेल्या शिक्षकाशी अनौपचारिक रीतीनं जोडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा समूह. अशा शाळांचं अजून संस्थीकरण झालेलं नसल्यानं एका शिक्षकाकडून ज्ञानार्जन करून दुसऱ्या शिक्षकाकडे दुसऱ्या शहरात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असे. लौकिक दृष्टीनं पाश्चात्त्य जग विभाजित असलं तरी धार्मिक दृष्टीनं चर्चच्या सर्वत्र पसरलेल्या दाट जाळ्यामुळे जोडलं गेलं होतं. कॅथोलिक चर्चची अधिकृत भाषा लॅटिन असल्यानं संपूर्ण पाश्चात्त्य जगात उच्चभ्रू शिक्षित वर्ग लॅटिनमध्ये ज्ञानव्यवहार करत असे. उदा.- इटालियन टॉमस अॅक्विनास १३व्या शतकात पॅरिसमध्ये येऊन अध्ययन आणि अध्यापन करतो.
अनौपचारिक शाळांच्या वाढत्या संख्येमुळे धर्मचिकित्सा, ईश्वरनिंदा, हेरेसीसारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. चर्चच्या चौकटीला हादरे बसतात म्हणून या अनौपचारिक शाळांच्या संस्थिकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. दुसऱ्या बाजूला, खासगी शिक्षकांच्या संघटना त्यांची स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी स्वत: नियमावली (statute) तयार करतात. विविध विषयांत पारंगत असलेले शिक्षक कॉर्पोरेशन स्थापन करतात, यातून एखाद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसारखी विश्वविद्यालयांची निर्मिती होऊ लागते. युरोपीय विश्वविद्यालयांचा जन्म या ऐतिहासिक प्रक्रियेतून झालेला आहे. नव्यानं अस्तित्वात येणाऱ्या शिक्षण क्षेत्रात गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी पोप अलेक्झांडर तिसरा ११७७ मध्ये अध्यापन परवाना ( Licentia Docendi) अनिवार्य करतो. ही एका प्रकारची मुलाखतच, जिथं तज्ज्ञांबरोबर चर्चचा प्रतिनिधीसुद्धा उपस्थित असे. विखुरलेल्या अनौपचारिक शाळांचं रूपांतर विश्वविद्यालयांत करून त्यांना कॅथोलिक चर्चच्या आधिपत्याखाली आणून ज्ञानव्यवहाराला नियंत्रित करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र पॅरिससारखं विश्वविद्यालय फक्त पोपला उत्तरदायी असल्यानं स्थानिक धर्मसत्तेला झुगारून विविध मार्गांनी वैचारिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतं.
थोडक्यात, विश्वविद्यालयांची स्थापना, वाढता व्यापार, आर्थिक उलाढालींमुळे वाढत्या शहरी बाजारपेठा आणि श्रमिक आणि शोषित वर्गाच्या पोटातून जन्मलेला बुर्ज्वा अर्थात नागरी मध्यमवर्ग, या सगळ्या गोष्टी पुरोहित आणि उमराव वर्गांच्या सत्तारूढ संदर्भबिंदूला धक्का देतात. त्यामुळे त्या मध्ययुगातील आधुनिकतेच्या ठिणग्या आणि पाऊलखुणा ठरतात. बुर्ज्वा हा शब्द बुर्ग (bourg) या फ्रेंच शब्दापासून बनलेला आहे. ‘बुर्ग’ म्हणजे बाजारपेठेचं शहर. बुर्ज्वा म्हणजे बाजारपेठेच्या शहरात व्यापार आणि तत्सम कारणांसाठी वास्तव्य करणाऱ्या उद्यामशील व्यक्ती. प्रसिद्ध इतिहासकार ऐरिक हॉब्सब्वॉम लिहितो की, पाश्चात्त्य आधुनिकतेचा वाहक ठरलेला हा बूर्ज्वा वर्ग त्याचं क्रांतिकारक कार्य आटोपून १९व्या शतकात निर्णायक रीतीनं त्याची मूल्यव्यवस्था संपूर्ण जगावर लादून विजेता बुर्ज्वा ( conquering bourgeois) म्हणून स्वत:ला प्रस्थापित करतो.
फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचेअभ्यासक
sharadcrosshuma@gmail.com

फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आज रात्री १२ वाजेपर्यंत 30 जणांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची विशेष टीम फलटणमध्ये दाखल होणार आहे.
मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही तातडीची कारवाई घडवून आणली आहे.
ही टीम मदतीसाठी लागणाऱ्या बोट्स, जीवन रक्षक उपकरणे व विविध तांत्रिक साधनांनी सज्ज असून, आज (रविवारी) पहाटेपासून ती फलटण तालुक्यात कार्यरत होईल. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर ही टीम उपाययोजना राबवणार आहे.
यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोररदार पाऊस सुरु आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण तालुक्यांमध्ये देखील पावसानं तुफान बॅटिंग केली आहे. माण तालुक्यात अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. फलटण तालुक्याला पावसानं तडाखा दिला आहे. फलटण तालुक्यात 251 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या 24 ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले यामुळं प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहनं केलं आहे.
माण तालुक्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.अनेक गावचे संपर्क तुटले आहेत. दहिवडी-फलटण रस्ता, शिंगणापूर- फलटण रस्ता, आंधळी-मलवडी रस्ता, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी या रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.तसेच शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे.
माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. दिवसभर शिंगणापूर तसेच परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे,नाले, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून तलावाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
दुष्काळी तालुका फलटणला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. फलटण तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर तब्बल 251 मिमी पावसाची नोंद झाली आहे. फळांंचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडीतील सुप्रसिद्ध धबधबा सुरू झालाय. मात्र त्याच्या सौंदर्यात आता धोका दडलेला आहे. फलटण शहरात मागील दोन दिवसांपासून पाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. नागरिक गुडघाभर पाण्यात उभे आणि प्रशासन मात्र निवांत, असं चित्र पाहायला मिळालं. बाणगंगा धरण आता 230 दशलक्ष घनफुटांनी तुडुंब भरलेलं आहे. बाणगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढतेय. धरणातून विसर्ग झाल्यास शहराला आणि लोकोस्तीतील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.प्रशासनाने नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बानगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्याने नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी देखील ज्या ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केली आहे. नदी, ओढे, नाल्याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामधील एक पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना दिले आहेत.
अधिक पाहा..

फलटण :- फलटण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत मुसळधार पावसामुळे संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत.
या आपत्तीजनक परिस्थितीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तात्काळ कारवाई करत एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) विभागाशी संपर्क साधून फलटणसाठी मदतीची तुकडी मागवली आहे. ही तुकडी लवकरच सस्तेवाडी परिसरात दाखल होऊन अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणार आहे.
फलटण शहरातील बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शनीनगर भागात पूरस्थिती गंभीर बनली असून, अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. बाधित नागरिकांना बाजारे शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि नागरिकांच्या मदतीसाठी तत्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले असून, एनडीआरएफ जवान लवकरच मदतीसाठी प्रत्यक्ष कारवाई सुरू करणार आहेत.

सातारा :- माण आणि खटाव तालुक्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून सद्यस्थितीत माण-खटाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असून, काही भागातील पूलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.
नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी:
नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व स्वतःच्या सुरक्षेसाठी सतर्क राहावे.
सावध रहा, सुरक्षित राहा!