
दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, मोबाईल आणि पल्सर मोटारसायकलसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
फलटण : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत धाडसी आणि शिताफीची कारवाई करत चार सराईत आरोपींना गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह जेरबंद केले. तब्बल सहा तास चाललेल्या फिल्मी स्टाईल पाठलागानंतर दुधेबावी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, सुरज काकडे, गणेश यादव, विक्रम बनकर, तुषार नलावडे आणि अमोल देशमुख यांचे विशेष पथक तयार करून दुधेबावी व परिसरात आरोपींचा शोध सुरू केला.
यावेळी संशयित आरोपी पल्सर मोटारसायकलवरून जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. मात्र आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत दुधेबावी, मिरढ, जावली, बरड परिसरात वेगाने पळ काढला. तरीही पोलिसांनी धाडसाने आणि चिकाटीने पाठलाग सुरू ठेवत अखेर दुधेबावी येथे आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत प्रतीक प्रमोद खुंटे (रा. मांडकी, ता. पुरंदर) आणि प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे (रा. काळूबाई नगर, साखरवाडी, ता. फलटण) या दोन आरोपींना प्रथम अटक करण्यात आली. प्रतीक खुंटे याच्या कमरेला लपवलेले गावठी पिस्टल पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी आणखी एक गावठी पिस्टल करण कानीफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण) याला समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे (रा. मांडव खडक, फलटण) यांच्या मदतीने विकल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी पुन्हा धाडसी कारवाई करत या दोन्ही आरोपींचाही पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन आणि एक पल्सर मोटारसायकल असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या आरोपींकडून गंभीर स्वरूपाचे दुष्कृत्य घडण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून प्रतीक खुंटे याच्यावर जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये, तर करण घोलप याच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनामुळे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागील तीन महिन्यांत पाच धाडसी कारवाया यशस्वी केल्याचे सांगण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांसह विविध स्तरांतून फलटण ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.







