Tuesday, August 11, 2026
Homeफलटणधम्माचा विचार अंगीकारल्यानेच चेहऱ्यावर कायम समाधान दिसू शकते – पारिजातका जगताप

धम्माचा विचार अंगीकारल्यानेच चेहऱ्यावर कायम समाधान दिसू शकते – पारिजातका जगताप

धम्माचा विचार अंगीकारल्यानेच चेहऱ्यावर कायम समाधान दिसू शकते – पारिजातका जगताप

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य, प्रबोधनकार आयु. महावीर भालेराव यांच्या सहचारिणी व पंचायत समिती फलटणच्या माजी सदस्या आयुनि कल्पना महावीर भालेराव यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित धम्ममय कार्यक्रमात विविध मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी शुभेच्छा देताना आयुनि पारिजातका बाबासाहेब जगताप म्हणाल्या, “आजच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम आयुनि कल्पना महावीर भालेराव यांना मंगलमय शुभेच्छा देते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम दिसणारे समाधान आणि भालेराव परिवाराने बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी दिलेले योगदान यामुळे हा परिवार धम्मशील कुटुंब म्हणून ओळखला जातो. जीवनात अनेक संकटे, सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात; मात्र प्रत्येक परिस्थितीत ज्यांच्या चेहऱ्यावर शांतता, सुख आणि समाधान दिसते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आयुनि कल्पना महावीर भालेराव होय. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे बुद्धधम्माच्या आचार-विचारांमुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या उज्ज्वल, निरामय व मंगलमय आयुष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करते.”

भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी पदाधिकारी तथा ज्येष्ठ धम्म उपासक धम्ममित्र आयु. राजेंद्रकुमार गायकवाड शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले, “आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वजण, भारतीय बौद्ध महासभा व बीबीएम फॅमिलीमधील एकोपा, परस्परांप्रती असलेला जिव्हाळा आणि प्रेम यामुळेच हा धम्मसोहळा घडत आहे. संपूर्ण फलटण तालुक्यात धम्माचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये आयु. महावीर भालेराव यांच्यासोबत आयुनि कल्पना भालेराव यांचेही मोलाचे योगदान आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा परिवार व बीबीएम फॅमिलीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो.”

यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे म्हणाले, “या परिवारामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचा वास आहे. येथील प्रत्येक व्यक्तीचे मन शुद्ध असल्यामुळे या वास्तूमध्ये बुद्धत्वाची अनुभूती येते. वयाची चाळिशी पार करूनही कल्पनाताई सतत माणसे जोडत धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यांच्या घरी येणारा कोणताही व्यक्ती चहा, नाश्ता किंवा किमान पाणी घेतल्याशिवाय परत जात नाही. अशा या कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि धम्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

कार्यक्रमात बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा, बुद्रुक तालुका शाखेचे संस्कार उपाध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. बजरंग गायकवाड यांनी धम्मकार्य पार पाडले. त्यांनी आयुनि कल्पना महावीर भालेराव यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले, “माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी महावीर भालेराव आणि त्यांच्या सहचारिणी कल्पना भालेराव यांनी उपस्थित राहून मला आधार दिला आहे. धम्ममार्गाने जीवन जगणारा हा परिवार भविष्यातही अशीच प्रगती करत राहो व त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, हीच मंगल कामना.”

या प्रसंगी भालेराव परिवाराचे नातेवाईक, कुटुंबीय, आयुनि कल्पना भालेराव यांचे माहेरकडील गायकवाड परिवार, महावीर भालेराव यांच्या भगिनी साबळे परिवार, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटणचे माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप, माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन विभागाचे रामचंद्र मोरे, संस्कार सचिव अमोल भोसले, संघटक आनंद जगताप, अमोल काकडे, विजयकुमार जगताप, धम्ममित्र बौद्धाचार्य सतीश कांबळे, माजी कायदेशीर सल्लागार अॅड. चंद्रशेखर मोरे, ज्येष्ठ धम्म उपासक राजेंद्रकुमार गायकवाड, महावितरणचे अभियंता अविनाश अहिवळे, संस्कार उपाध्यक्ष बजरंग गायकवाड तसेच भालेराव परिवाराचे सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments