Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रवटपौर्णिमेनिमित्त प्रभाग क्र. १० मध्ये स्वच्छता अभियान; महिलांसाठी उत्कृष्ट सुविधा, पर्यावरण संवर्धनाचा...

वटपौर्णिमेनिमित्त प्रभाग क्र. १० मध्ये स्वच्छता अभियान; महिलांसाठी उत्कृष्ट सुविधा, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

अकलूज | प्रतिनिधी. अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये वटपौर्णिमेनिमित्त धार्मिक परंपरा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून वटपूजनासाठी येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमासाठी अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे तसेच प्रभाग क्रमांक १० च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका मनिषाताई तिकोटे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता, पूजनस्थळाची देखभाल तसेच महिलांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले. त्याच स्मरणार्थ विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात.

यंदा या पारंपरिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली. महिलांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, निसर्गाचे जतन करावे आणि स्वच्छतेचा संदेश समाजात पोहोचवावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

प्रभागातील महिलांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत नगर परिषद आणि लोकप्रतिनिधींच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. धार्मिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments