Saturday, September 19, 2026
Homeसातारासाताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर तुषार दोशी यांची नियुक्ती; समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे...

साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर तुषार दोशी यांची नियुक्ती; समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे वर्णी

सातारा |साताऱ्यातील पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता तुषार दोशी हे नवे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. गृह मंत्रालयाने गुरुवारी राज्यातील 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नव्या पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवनियुक्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे 2001 मध्ये फिजिक्स विषयात पदवी प्राप्त करून पोलीस दलात दाखल झाले. त्यांनी नाशिकमध्ये पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पहिली पोस्टिंग मिळवली. राजुरा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी नक्षलप्रभावीत भागातील कर्तव्ये समर्थपणे पार पाडली. पुढे लातूर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई अशा प्रमुख शहरांमध्ये जबाबदारी सांभाळताना त्यांनी विविध गुन्हेगारी प्रकरणे निष्पक्षतेने हाताळली. पुणे पोलिस दलातील सायबर विभागात उपायुक्त असताना त्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे उघडकीस आणण्यावर भर दिला.

दरम्यान, समीर शेख यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये गडचिरोलीहून साताऱ्यात पदभार स्वीकारला होता. तब्बल पावणेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात 40 पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करत सुमारे 176 जणांना ‘मोका’ अंतर्गत गजाआड केले. ‘उंच भरारी’ योजनेच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन दिले तर पोलीस क्रीडा प्रबोधिनीला त्यांनी नवे यश मिळवून दिले. प्रतापसिंहनगर, प्रतापगड व पुसेसावळी दंगलप्रकरणी त्यांनी घेतलेल्या कठोर व संवेदनशील भूमिकेमुळे त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती.

    RELATED ARTICLES

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Most Popular

    Recent Comments