मनोमिलन नाट्यावर रणजितसिंहांचा पडदा! ‘ज्यांनी शेतकऱ्यांना अडवले, त्यांच्यासोबत स्वप्नातही बसणार नाही’

0
28
मनोमिलन नाट्यावर रणजितसिंहांचा पडदा! ‘ज्यांनी शेतकऱ्यांना अडवले, त्यांच्यासोबत स्वप्नातही बसणार नाही’

फलटण :- फलटण तालुक्यात गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मनोमिलन नाट्यावर अखेर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट भूमिका घेऊन पडदा टाकला आहे. “ज्यांनी शेतकऱ्यांना अडवले, तालुक्याला मागे नेले, त्यांच्यासोबत स्वप्नातही बसणार नाही,” असा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

राजाळे येथे रविवारी झालेल्या सभेत बोलताना, रणजितसिंह म्हणाले, “जनतेने तीस वर्षांची सत्ता नाकारून आम्हाला संधी दिली आहे. ज्यांनी तालुक्याचा विकास थांबवला, त्यांच्यासोबत मनोमिलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

‘मनोमिलन’वर कार्यकर्त्यांचा स्पष्ट नकार

सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना थेट विचारले, “मनोमिलन करायचं का?” यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने “नाही!” असा नारा दिला. यावरून तालुक्यातील जनतेचा सूर स्पष्टपणे रणजितसिंह यांच्या भूमिकेच्या पाठीशी असल्याचे दिसले.

‘सन्मान ठेवला, पण दुजोरा नाही’

रामराजे नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह यांच्यात झालेल्या भेटींविषयी विचारता, “विरोधक म्हणून त्यांनी काही काम सांगितले तर सन्मान ठेवायचा असतो,” असे म्हणत रणजितसिंह यांनी भेटींचे खंडन केले नाही, मात्र मनोमिलनाला दुजोरा देखील दिला नाही.

रामराजेंनी चेंडू टाकला होता…

यापूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, “मनोमिलन दोन मनांचे असते. फलटणच्या विकासासाठी असेल तर मनोमिलन होईल,” असे वक्तव्य केले होते. मात्र रविवारी रणजितसिंह यांनी शांत पण ठाम शब्दांत “मनोमिलन सध्या तरी नाही,” असे जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

थोडक्यात:

  • रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांबरोबर मनोमिलनाला नकार दिला
  • कार्यकर्त्यांचा एकमुखाने विरोध
  • वीस दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम