ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे

0
22
ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे

ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे

ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे
पवारवाडी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मौजे पवारवाडी येथे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन व विवाह संस्कार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व विषद केले.

मार्गदर्शन करताना घोरपडे म्हणाले की, ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी तथागत गौतम बुद्धांनी कपिलवस्तू येथे ‘महासमय सुत्त’चे ऐतिहासिक प्रवचन दिले होते. तसेच सम्यक संबोधी प्राप्तीनंतर ब्रह्मदेशातील व्यापारी तपस्सू आणि भल्लिक यांनी तथागतांना अन्नदान करून धम्मोपदेश स्वीकारला होता. याच दिवशी सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांनी बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेत नेऊन बुद्ध धम्माच्या प्रसाराचे कार्य केले. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
यावेळी त्यांनी सर्व बौद्ध बांधवांनी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जवळच्या बौद्ध विहारात जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून धम्माचे आचरण करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. अमोल भोसले व त्यांच्या सहचारिणी आयुनि उमिता अमोल भोसले यांच्या विवाह संस्कार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर यांनी माता रमाई यांच्यावरील “कुंकू लाविलं रमानं” हे गीत सादर करून भोसले दाम्पत्याला विवाह संस्कार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील रमाई यांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षपूर्ण योगदानाचा उल्लेख करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

बौद्धाचार्य महावीर भालेराव म्हणाले की, पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. परस्पर आदर, सन्मान आणि समन्वय यांच्या आधारावर बौद्ध धम्माच्या तत्त्वांनुसार वैवाहिक जीवन जगल्यास कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. प्रत्येक संघर्षातूनच यशाचा मार्ग निर्माण होत असतो. त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वंदन करून जीवन मंगलमय करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.

या कार्यक्रमास माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, धम्म उपासक विजय निकाळजे तसेच बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.