गुंतवणुकीचं अमिष, कोट्यवधींचा गंडा – ‘ब्लॉक ऑरा’ प्रकरणातील फसवणूक उघड

0
19
गुंतवणुकीचं अमिष, कोट्यवधींचा गंडा – ‘ब्लॉक ऑरा’ प्रकरणातील फसवणूक उघड

बारामती : बारामती शहरात दीड वर्षात तीनपट परतावा देण्याचं आमिष दाखवत ‘ब्लॉक ऑरा’ नावाच्या कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीवर विश्वास ठेवून लाखो रुपये गुंतवले, पण नंतर मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

गुंतवणूकदार एस. ए. काझी यांनी २०२२ मध्ये एमआयडीसी भागात नंदन पवार या व्यक्तीमार्फत ‘ब्लॉक ऑरा’ कंपनीची माहिती घेतली. “दीड वर्षात तीनपट परतावा” मिळेल, असे सांगत त्यांना रॉयल इन हॉटेलमध्ये आयोजित सेमिनारसाठी बोलावण्यात आलं. या सेमिनारमध्ये रियाज पटेल, फिरोज मुलतानी, नितीन जगतीयानी यांनी स्वत:ला संचालक म्हणून ओळख देत मोठा परतावा कसा मिळेल हे समजावून सांगितले.

याच वेळी स्थानिक प्रतिनिधी म्हणून विजयकुमार गायकवाड, नंदकुमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार आणि नंदन पवार यांची ओळख करून देण्यात आली. गुंतवणुकीसाठी या लोकांशी संपर्क ठेवावा असे सुचवले गेले.

काझी यांनी पैसे गुंतवल्यानंतर वेबसाईटवर सुरुवातीला रक्कम वाढताना दिसली. मात्र काही महिन्यांनंतर अधिक पैसे गुंतवण्याचा आग्रह सुरु झाला. दुसरा युजर-आयडी काढा, पुन्हा गुंतवा अशी मागणी झाली. यानंतर वेबसाईटच अचानक बंद पडली. सुरूवातीला तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या, पण नंतर संपर्कच तुटला.

फसवणूक लक्षात आल्यानंतर काझी यांनी बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दोन वर्षांपासून न्याय मिळालेला नाही.

या प्रकारामुळे फसवणूक करणाऱ्यांना खुलेआम वावरण्याची मुभा मिळाली असून, पोलिस यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.