Tuesday, August 18, 2026
Homeसाताराफलटणमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी तिसऱ्या...

फलटणमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरू

फलटण प्रतिनिधी | साहस Times. फलटणमध्ये आयकर विभागाने 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तब्बल तिसऱ्या दिवशीही ही चौकशी सुरूच आहे.

पहिल्या दिवशी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी झाली. दुसऱ्या दिवशीही फलटण येथे सकाळी 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत आयकर विभागाचा तपास सुरू होता. आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

समर्थकांमध्ये नाराजी, सोशल मीडियावर निषेध

या चौकशीविरोधात नाईक निंबाळकर समर्थकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात काम केल्यामुळेच ही कारवाई होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, आजही संजीवराजे यांच्या फलटण येथील बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. विविध गावांतील पुढारी, आजी-माजी पदाधिकारी सकाळपासूनच तिथे उपस्थित होते.

सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजीवराजे यांना ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’ कंपनीत चौकशीसाठी नेले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कंपनीचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पुणे येथील लक्ष्मी निवासस्थानाची चौकशी 50 तासांनंतर संपली

    श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यातील लक्ष्मी निवासस्थानी सुरू असलेली तपासणी तब्बल 50 तासांनी पूर्ण झाली. कोणत्याही संशयास्पद व्यवहाराचे पुरावे न आढळल्याचे समोर आले असून, नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी चौकशीस सहकार्य केल्याची माहिती मिळाली.

“सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागडीत तोलता येत नाही” – श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “आयकर विभागाचे अधिकारी चांगले आहेत, ते प्रत्येक कागद तपासत आहेत. जर काही चुकीचे असेल तर ते आढळेल, पण नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. महाराष्ट्रात काही घराण्यांकडे पूर्वीपासून संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाला एकाच चष्म्यात बघणे योग्य नाही.”

चौकशी अजून दोन दिवस चालण्याची शक्यता असून, कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती रघुनाथराजे यांनी दिली. मात्र, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे का, यावर त्यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही.

➡️ या चौकशीचा पुढील काय निष्कर्ष लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments