फलटण शहरात ८ ठिकाणी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी
फलटण, दि. २ (प्रतिनिधी) : शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन फलटण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध प्रमुख ठिकाणी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून शहरात तब्बल ८ ठिकाणी अत्याधुनिक मुताऱ्या व सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत अहिल्यादेवी शॉपिंग सेंटर आणि महात्मा फुले चौक येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली असून, लवकरच इतर ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ स्वच्छतागृहांची सुविधा मिळावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यास मदत व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
उभारण्यात येणाऱ्या या स्वच्छतागृहांमुळे बाजारपेठ, प्रमुख चौक आणि सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असून, शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीनेही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
दरम्यान, आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी अहिल्यादेवी शॉपिंग सेंटर व महात्मा फुले चौक येथे उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची पाहणी करून कामाची माहिती घेतली. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आणि देखभाल व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी गटनेते रोहित नागटिळे, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर, नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, नगरसेवक अशोकराव जाधव, किरण राऊत, माजी नगरसेवक अजय माळवे आदी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच स्वच्छ व सुंदर फलटण घडविण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
