Saturday, August 22, 2026
Homeसाताराबारामतीत गुंडगिरीचा कहर! 'मी बारामतीचा भाई' म्हणत युवकाला मारहाण; रोख रक्कम लुटली

बारामतीत गुंडगिरीचा कहर! ‘मी बारामतीचा भाई’ म्हणत युवकाला मारहाण; रोख रक्कम लुटली

बारामती, ५ मार्च: ‘मी बारामतीचा भाई आहे. मला उधारी मागतो का?’ असे म्हणत एका युवकाला बेदम मारहाण करत त्याच्या खिशातील १,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:

  • हर्षद राजू काकडे ऊर्फ बागवान (रा. आमराई, बारामती)
  • अमर सोनवणे ऊर्फ पिन्या (पत्ता नमूद नाही)

याप्रकरणी रोहित मिलिंद बनसोडे (वय २५, रा. हरिकृपानगर, बारामती) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे हॉटेल चैत्रालीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद बागवान हा पूर्वीपासूनच हॉटेलमध्ये दहशत माजवत होता. तो अनेकदा लोखंडी हत्यारे आणि लाकडी दांडके घेऊन येत जबरदस्तीने वस्तू आणि पैसे उचलत असे.

काही दिवसांपूर्वीच त्याने हॉटेलमधून ७०० रुपयांची दारू घेतली होती, त्या उधारीची मागणी फिर्यादीने केल्यावर हर्षद बागवान भडकला. ‘मी बारामतीतील गुंड आहे, मला हर्षाभाई म्हणतात, कोणीच मला उधारी मागत नाही, तुला राहायचे असेल तर गप्प बस’ असे म्हणत त्याने धमकी दिली होती.

रात्रीच्या वेळी हल्ला

२७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रोहित बनसोडे हे आपल्या आई आणि पुतणीसह पूनावाला गार्डनसमोर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्याच वेळी, दुचाकीवर आलेल्या हर्षद आणि अमर यांनी त्यांना शिवीगाळ करत ‘उधारी का मागतोस?’ असे म्हणत मारहाण केली.

त्यांनी ‘आम्ही बारामतीतील गुंड आहोत, पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आमचे रेकॉर्ड तपास. आमच्या नादाला लागू नको’ अशी धमकी दिली आणि रोहित बनसोडे यांच्या खिशातील १,००० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. फिर्यादीच्या आईने आरडाओरडा केल्यावर आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली आणि दुचाकीवरून पळ काढला.

याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

📌 महत्त्वाचे मुद्दे:

✔️ बारामतीत सर्रास गुंडगिरी; पोलिसांपुढे खुलेआम दहशत
✔️ हॉटेल मॅनेजरला ‘मी भाई आहे’ म्हणत मारहाण
✔️ धमकी देऊन १,००० रुपये हिसकावले
✔️ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments