धनगर समाजाचा हक्क, न्याय आणि सन्मानासाठी एल्गार; फलटण तहसीलदारांना निवेदन
आरक्षणाची अंमलबजावणी, मेंढपाळांच्या चराई हक्कांसह विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची सकल धनगर बहुजन समाजाची मागणी
फलटण प्रतिनिधी : धनगर समाजाच्या हक्क, आरक्षण, सामाजिक न्याय आणि विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर बहुजन समाज बांधवांच्या वतीने फलटण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
‘धनगर समाजाचा हक्क, न्याय आणि सन्मान!’ या भूमिकेतून देण्यात आलेल्या निवेदनात आरक्षणापासून मेंढपाळांच्या चराई हक्कांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांपासून युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांपर्यंत विविध मागण्यांचा समावेश आहे.
धनगर आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयातील लढाई शासनाने पूर्ण ताकदीने लढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाचा निर्णय प्रतिकूल झाल्यास समाजाच्या आरक्षणासाठी ठोस ‘Plan-B’ तयार करून आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र रूपनवर आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी
डॉ. कै. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्याप्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी
संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष शासकीय कायदा करावा, तसेच देवस्थानाचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी स्वतंत्र कायदेशीर व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देवस्थानातील विश्वस्त मंडळात धनगर समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे आणि अध्यक्ष धनगर समाजातील असावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
मेंढपाळांच्या चराई हक्कांसाठी कायमस्वरूपी धोरण
धनगर समाजातील मेंढपाळांच्या पारंपरिक व्यवसायासमोर अनेक अडचणी निर्माण होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. वनक्षेत्र, गायरान आणि इतर शासकीय जमिनींच्या वापराबाबत पारंपरिक चराई हक्कांचा विचार करून कायमस्वरूपी चराई धोरण तयार करावे, अशी मागणी आहे.
मेंढपाळांच्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. मेंढपाळांवर होणारे हल्ले तसेच पशुधन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मेंढ्या-शेळ्यांसाठी सुलभ विमा योजना
मेंढ्या व शेळ्यांसाठी विमा योजना अधिक सुलभ करावी. पशुधनाचा मृत्यू, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित मेंढपाळांना वेळेत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पारंपरिक व्यवसायाला आर्थिक पाठबळ
धनगर समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे. लोकरीपासून तयार होणाऱ्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि मेंढपाळांच्या उत्पादनांना योग्य दर मिळण्यासाठी शासनाने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील लिंकला वीर सिंगोबा धनगर यांचे नाव
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील नवीन कनेक्टिंग लिंकला वीर सिंगोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील महत्त्वाच्या चौकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व मार्गदर्शनाच्या सुविधा
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि उच्च शिक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी. तालुकास्तरावर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या योजना
धनगर समाजातील युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या विशेष योजना प्रभावीपणे राबवाव्यात. कौशल्य प्रशिक्षण, उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज तसेच अनुदानाच्या योजना उपलब्ध करून देऊन युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनातील प्रत्येक मागणीच्या पूर्ततेबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेऊन त्याची माहिती समाजास द्यावी, तसेच निवेदन संबंधित विभागाकडे तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती सकल धनगर बहुजन समाज बांधवांनी केली आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य आणि हक्काच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सामाजिक न्यायाची भूमिका प्रत्यक्षात आणावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
स्थळ : फलटण, जि. सातारा
