
अदानी समुहाकडून होणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत धारावीचा विकास अदानी समुहाकडून न करता राज्य सरकारने करावा या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी अदानी समूहासह शिंदे सरकारवर दलाली केल्याचा आरोप केला. तसेच माझ्याकडे अडकित्ता व खलबत्ता आहे, दलाली चेचून काढू, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर अदानी समूहाकडून प्रकल्पाबाबत खुलासा करण्यात आला आहे. धारावी प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अंतिम झाल्याचा दावा अदाणी समूहाने केला आहे.



