कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लोकशाहीचा उत्सव; शंभर टक्के विद्यार्थ्यांनी केले मतदान

0
3
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लोकशाहीचा उत्सव; शंभर टक्के विद्यार्थ्यांनी केले मतदान

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लोकशाहीचा उत्सव; शंभर टक्के विद्यार्थ्यांनी केले मतदान

बिजवडी (ता. माण) :- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026 निमित्त आयोजित करण्यात आलेली वर्ग मुख्यमंत्री सार्वत्रिक निवडणूक–2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे आणि नेतृत्वगुणांचा विकास करणे हा या अभिनव उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता माण तालुक्याच्या मंडलाधिकारी मा. सौ. दौंड मॅडम यांच्या हस्ते मतदान केंद्राचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी करून सर्व व्यवस्था समाधानकारक असल्याची खात्री केली आणि मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला.

निवडणुकीपूर्वी सर्व उमेदवारांनी प्रचार करत विद्यार्थ्यांसमोर आपली भूमिका, उद्दिष्टे आणि विकासाचा आराखडा मांडला. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे मतदान केंद्र, मतपेटी, मतपत्रिका, मतदान अधिकारी आणि मतदार यादीची व्यवस्था करून संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान करून लोकशाही प्रक्रियेबद्दलची आपली जागरूकता आणि जबाबदारी अधोरेखित केली. मतदानानंतर मतमोजणी करून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

या उपक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. सावंत डी. जी. यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. सर्व वर्गशिक्षक, विषयशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

उद्घाटन समारंभास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. हणमंतराव भोसले, विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. संदीप भोसले, उपाध्यक्ष श्री. रुपेश भोसले, सदस्य श्री. गणेश भोसले, बिजवडी गावचे तलाठी श्री. पंडित आण्णा, माणदेश न्यूजचे वार्ताहर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे आणि लोकशाही प्रक्रियेतील उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्ये अधिक दृढ होतात, असे मत व्यक्त केले.
विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

“लोकशाहीचा मूलमंत्र आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, शंभर टक्के मतदानाची नोंद हा या उपक्रमाचा विशेष ठरला.”