फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी; रुद्राभिषेकाने शिवभक्तीचा जागर

0
3
फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी; रुद्राभिषेकाने शिवभक्तीचा जागर

फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी; रुद्राभिषेकाने शिवभक्तीचा जागर

फलटण : फलटण येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात भक्ती आणि शिवप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वराज्याप्रती असलेल्या अतुलनीय बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण परिसर ‘जय शिवराय’ आणि ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण हे छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असल्याने या शहराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच नव्या पिढीने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास शिवभक्त, नागरिक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.