अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा ; उष्णतेपासून नागरिकांची सुटका

0
24
अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा ; उष्णतेपासून नागरिकांची सुटका

अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा ; उष्णतेपासून नागरिकांची सुटका

फलटण : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांनी होरपळून निघालेल्या फलटणकरांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला. शहरासह उपनगरांमध्ये अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना असह्य उष्णतेपासून काही प्रमाणात मुक्ती मिळाली आहे.
सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारनंतर उकाड्यात अधिक वाढ झाली होती. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. रस्त्यांवरील धूळ वाहून गेल्याने वातावरण स्वच्छ व आल्हाददायक झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला आश्रय घेतला. मात्र उष्णतेचा तडाखा कमी झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. शेतकरी वर्गानेही या पावसाचे स्वागत केले असून, आगामी पेरणीपूर्वी झालेला हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.