Wednesday, August 26, 2026
Homeसाताराबुद्ध विहार व परिसर स्वच्छतेतून कोळकी येथे संत गाडगेबाबा यांची १५० वी...

बुद्ध विहार व परिसर स्वच्छतेतून कोळकी येथे संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी


फलटण (कोळकी) : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोळकी येथील बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून जयंती उत्साहात आणि विधायक पद्धतीने साजरी करण्यात आली. विहार व परिसर झाडून स्वच्छ करत तसेच कीर्तनातून मन शुद्ध करण्याचा संदेश देत महिलांनी संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील, भीमस्मरण, भीम स्तुती व बुद्ध पूजेद्वारे झाली. उपस्थित सर्व महिला उपासिकांनी धम्ममय वातावरणात श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला. आयु. सुहास रामचंद्र माने यांनी सर्व बौद्ध उपासक-उपासिकांना फलाहार म्हणून केळी व आयुर्वेदिक चहा देऊन सेवा दिली.
यावेळी आयुनी रजनी सुहास माने, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या प्रमुख आयुनी चित्राताई गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताताई काकडे, आरती पाटील, विद्या खंदारे, कीर्ती माने, परिमिता कांबळे, बेबीनंदा रामचंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुनी चित्राताई गायकवाड यांनी सांगितले की, संत गाडगेबाबा यांनी समाजातील लोकांना जागृत करून स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवसेवेचा अमूल्य संदेश दिला. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, आजारी व अपंगांना उपचार, तसेच पशुपक्षी व मुक्या प्राण्यांप्रती दया असे अनेक मानवतावादी विषय त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांचे विचार केवळ जयंतीपुरते न ठेवता आचरणात आणणे हीच खरी अभिवादनाची भावना आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि त्यांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचा संकल्प जसा आपण करतो, तसाच संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व मानवसेवेच्या कार्यालाही पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. कोळकी विहारातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील काळातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
संत गाडगेबाबांच्या “स्वच्छता हीच खरी पूजा” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत कोळकी येथील महिलांनी जयंती साजरी करण्याची ही प्रेरणादायी पद्धत समाजासाठी आदर्श ठरली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments