जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण क्षण

0
10
जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण क्षण


साहस Times  | कर्नाटक राज्यातील कणगणहल्ली/सन्नती येथील इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकातील ‘अधलोक’ महास्तूपाला दिलेल्या भेटीदरम्यान मौर्य घराण्याचे तिसरे शासक, जंबुद्वीपाचे देवांना प्रिय ‘प्रियदर्शी’ चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे दुर्मिळ शिल्प प्रत्यक्ष पाहण्याचा आणि त्याविषयी सविस्तर माहिती देण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय ठरला.
दि. २४ ते २७ जानेवारी दरम्यान आयोजित सन्नती अभ्यास दौर्‍यात महाराष्ट्रातील सुमारे ४० उपासक सहभागी झाले होते. या दौर्‍यादरम्यान अधलोक महास्तूप परिसरात असलेले सम्राट अशोक यांचे शिल्प जवळून पाहण्याची संधी मिळाली. शिल्पाच्या जवळ जाऊन त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मौर्यकालीन कला, बौद्ध धम्माचा प्रसार आणि सम्राट अशोक यांच्या कार्याचा व्यापक संदर्भ सहभागी उपासकांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आला.
इतिहास, पुरातत्त्व आणि बौद्ध परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या स्थळावर उभे राहून अशोककालीन वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण क्षण असल्याची भावना अनेक उपासकांनी व्यक्त केली. अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे हा दौरा केवळ दर्शनापुरता न राहता ऐतिहासिक जाणीव जागवणारा आणि प्रेरणादायी ठरला.
सन्नती येथील उत्खननातून समोर आलेला हा वारसा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळाची साक्ष देतो. अशा स्थळांना भेटी देऊन त्यांचा सखोल अभ्यास करणे आणि पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सूरज रतन जगताप ( लेणी अभ्यासक )