Monday, August 17, 2026
Homeफलटणभारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाला नगराध्यक्षांकडून अनोखी भेट

भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाला नगराध्यक्षांकडून अनोखी भेट

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील कृतीने युवक भारावले

फलटण, दि. १७ (प्रतिनिधी) — देशसेवेचे स्वप्न पूर्ण करून भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाचा फलटण शहरात उत्साहात सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्याला एक वेगळीच भावनिक उंची मिळाली ती फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दाखवलेल्या आत्मीयतेमुळे. त्यांच्या साध्या पण हृदयस्पर्शी कृतीमुळे उपस्थित युवकांसह नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण झाले असून शहरभर या प्रसंगाची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी रात्री नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून फलटण शहरात परतले होते. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासमवेत रात्री उशिरापर्यंत बाहेर पडले होते.
ब्राम्हण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते मारवाड पेठ मार्गे जात असताना काही युवक एका तरुणाला खांद्यावर घेऊन जल्लोष करताना त्यांना दिसले. रात्रीच्या वेळी सुरू असलेला हा आनंदोत्सव पाहून नगराध्यक्षांनी तत्काळ आपली गाडी थांबवून नेमका काय प्रकार सुरू आहे, याची विचारपूस केली.
यावेळी उपस्थित युवकांनी सांगितले की, हवालदार सुदाम भिमराव जाधव यांचे नातू तसेच सुभेदार देवदास जाधव यांचे चिरंजीव प्रणव देवदास जाधव याची भारतीय सैन्यात निवड झाली असून मित्रमंडळी त्याच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. ही माहिती समजताच नगराध्यक्षांनी प्रणव जाधव याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, शुभेच्छा देऊन नगराध्यक्ष पुढे निघून गेले होते. मात्र काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या मनात त्या युवकाबद्दलचा सन्मान आणि आपुलकी अधिक दृढ झाली. त्यांनी पुन्हा गाडी थांबवून युवकांजवळ येत प्रणव जाधव याला जवळ बोलावले. संवादादरम्यान प्रणव हा सूरज भिसे पाटील यांच्या स्वरूपा अकॅडमीचा विद्यार्थी असल्याचे समजले.
यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खिशातील पेन काढून प्रणवच्या शर्टच्या कॉलरला लावले आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत भावनिक शब्दांत म्हणाले, “माझ्याकडे तुला देण्यासाठी आत्ता काही नाही, पण माझ्याकडे हे पेन आहे. हेच तुला भेट म्हणून देतो. देशसेवेत मोठं नाव कमव.” असे म्हणत त्यांनी स्वतःचे पेन प्रणवला भेट दिले.
नगराध्यक्षांच्या या अनपेक्षित आणि मनाला भिडणाऱ्या कृतीमुळे उपस्थित युवक भारावून गेले. काही क्षण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. युवकांनी टाळ्यांच्या गजरात नगराध्यक्षांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व युवकांनी नगराध्यक्षांसोबत छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगानंतर फलटण शहरात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील स्वभावाची चर्चा रंगू लागली आहे. कोणताही दिखावा न करता एका सैनिक कुटुंबातील युवकाच्या यशाचा सन्मान करण्यासाठी केलेली ही साधी पण हृदयस्पर्शी कृती अनेकांच्या मनाला भावली आहे. सामाजिक माध्यमांवरही या घटनेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून देशसेवेसाठी पुढे येणाऱ्या युवकांचा सन्मान प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रणव जाधव यांच्या यशामुळे फलटण शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान आणि देशसेवेची भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments