
सहकाराला राजकारणापेक्षा प्राधान्य देणारा विचारवंत हरपला; सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
फलटण | प्रतिनिधी :- फलटणच्या सामाजिक, सहकार, पर्यावरण आणि जनआंदोलनांच्या क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्या अकस्मात निधनाने फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आंबेडकर चळवळीतील लढवय्ये नेतृत्व, शरद पवार यांच्या विचारांचे निष्ठावंत शिलेदार आणि सहकार चळवळीचे अभ्यासू निरीक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रासह सहकार चळवळीने एक अभ्यासू, परखड आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
नंदकुमार मोरे यांनी आपल्या लेखनातून आणि सामाजिक कार्यातून नेहमीच “राजकारण निवडणुकीपुरते, पण विकास आणि सहकार कायमच अग्रेसर असला पाहिजे” हा विचार समाजासमोर मांडला. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेले विचार हे सहकार चळवळीतील परिपक्वतेचे प्रतीक मानले जात होते. सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि साखर उद्योगाशी संबंधित सर्व घटकांचे हित हेच सहकाराचे अंतिम ध्येय असले पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका होती.
सहकारी संस्था या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक गटबाजीचे केंद्र न बनता सभासदांच्या आर्थिक उन्नतीचे प्रभावी माध्यम असाव्यात, असा त्यांचा सातत्यपूर्ण आग्रह होता. सहकार क्षेत्रात मतभेदांपेक्षा संवाद, समन्वय आणि सामंजस्य आवश्यक असल्याचे ते नेहमी सांगत असत. त्यांचे मत होते की, सभासद हा संस्थेचा खरा मालक असून त्याला जागरूक, प्रशिक्षित आणि निर्णयक्षम बनविणे ही नेतृत्वाची जबाबदारी आहे.
फलटण शहरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक न्याय, जनहिताचे प्रश्न आणि विविध लोकचळवळींमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, संयमी स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीमुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली.
अलीकडेच त्यांनी सहकार क्षेत्रातील सकारात्मक घडामोडींवर भाष्य करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सहकार बळकट करण्याची गरज अधोरेखित केली होती. तालुक्याच्या विकासासाठी सहकार चळवळ मजबूत राहणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. त्यांचे हे विचार आजही अनेकांसाठी दिशादर्शक ठरत आहेत.
त्यांच्या अकस्मात निधनामुळे फलटण तालुक्याने समाजहितासाठी अखंड झटणारा, सहकाराचा अभ्यासू विचारवंत आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता गमावला आहे. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
नंदकुमार मोरे यांचे विचार, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि सहकार चळवळीबाबतची दूरदृष्टी पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली!









