
Rs 13850 Crore Scam Fugitive Arrested In Belgium: भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवर झालेल्या 26/11 या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागचा खरा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेमधून भारतात आणल्यानंतर आता भारत सरकारच्या गळाला लवकरच आणखीन एक मोठा मासा लागणार आहे. मागील सात वर्षांपासून देशातून फरार असलेला आणि तब्बल 13 हजार 850 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात वॉन्टेंड असलेल्या आरोपीला परदेशात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारताने प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर या आरोपीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. ज्या आरोपीबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे, मेहुल चोक्सी! त्याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे.
सीबीआयच्या विनंतीवरुन कारवाई
पंजाब नॅशनल बँकेतील 13850 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली हवा असलेला मेहुल चोक्सी त्याची पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममधील अँटवर्पमध्ये राहत आहे. मेहुलला अटक करण्यात आल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला असून सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीवरून 65 वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे, असे ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
जामीनासाठी प्रयत्न करण्याची शक्यता
पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन ओपन-एंडेड अटक वॉरंटचा संदर्भ दिला आहे. ही वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मात्र आता भारताच्या मागणीनुसार बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर चोक्सी प्रकृती अस्वस्थ्य असण्याचं कारण देत किंवा इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटकेची मागणी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता तो या छोट्याश्या देशाचा आहे नागरिक
पंजाब नॅशनल बँकेतील 13850 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली हवा असलेला चोक्सी आता अँटिग्वा आणि बारर्म्युडा नागरिक आहे. छोटं बेटवजा राष्ट्र असलेल्या अँटिग्वा आणि बारर्म्युडावरुन चोक्सी वैद्यकीय उपचारांसाठी हा देश सोडून बेल्जियममध्ये गेला असल्याची माहिती समोर येत आहे. चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सह-आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधून प्रत्यार्पणाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे.
घोटाळा समोर येण्याच्या काही आठवडे आधीच पळाला
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच पंजाब नॅशनल बँकमध्ये या काका-पुतण्याने केलेला घोटाळा उघडकीस येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2018 मध्ये दोघांनी भारतातून पळ काढला होता. त्यानंतर पहिल्यांदाच चोक्सीला अटक करण्यात आली आहे. हे भारतासाठी मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.