Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीला बहुमत, पण सरकार स्थापनेचा पेच कायम; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा, जबाबदाऱ्या...

महायुतीला बहुमत, पण सरकार स्थापनेचा पेच कायम; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा, जबाबदाऱ्या सोपविल्या

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापनेसाठी हालचाली अपूर्ण आहेत. आठ दिवस उलटूनही मंत्रिमंडळाच्या वाटपाचा निर्णय झालेला नाही, तर मुख्यमंत्री पदासाठीही चर्चेचा गोंधळ सुरू आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आघाडीतील नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली.

जितेंद्र आव्हाड गटनेते; रोहित पाटील मुख्य प्रतोद

या बैठकीत विधानसभेतील पराभवाचे कारण शोधण्यासह नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. रोहित आर.आर. पाटील यांना मुख्य प्रतोद, तर उत्तम जानकर यांना प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

संदीप क्षीरसागर गैरहजर; चर्चांना उधाण

या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर गैरहजर होते, यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. क्षीरसागर अनुपस्थित राहण्याचे कारण विचारले असता, जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात नियोजित कार्यक्रम असल्याचे स्पष्ट केले.

महायुतीच्या सरकार स्थापनेतील अडचणी आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचे परिणाम या दोन्ही मुद्द्यांवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments