
ऋतू बदल झाल्यावर पक्ष्यांच्या स्थलांतराला सुरूवात होते. काही पक्षी प्रजननासाठी तर काही पक्षी कडक हिवाळा ऋतू टाळण्यासाठी स्थलांतरित होत असतात. असाच एक बगळा रशियाच्या पार टोकाला असलेल्या सैबेरिया प्रांतातून तब्बल ३६७६ किलोमीटर उडत भारतात राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील खिचन गावात आला असल्याची नोंद येथील पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. या बगळ्याच्या पायाला लावलेल्या टॅगमधून ही माहिती मिळाली आहे. हा नर जातीचा बगळा असून २० जुलै २०२४ रोजी रशियात बगळ्यावर संशोधन करणाऱ्या पक्षीतज्ज्ञांनी त्याच्या पायाला टॅग लावला होता, अशी माहिती रशियातील बगळ्याच्या अभ्यासक एलेना मुद्रिक यांनी दिली.








