Sunday, September 20, 2026
Homeसातारामाझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा, संवेदना आणि जबाबदारी

माझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा, संवेदना आणि जबाबदारी

फलटण :- नेहमीप्रमाणेच उद्या विधानसभा निवडणुकीसाठी (Election Duties 2024) जायचं होतं. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे सचिन ढोले साहेब निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने महिलांना बूथ व घरी जाण्याची व्यवस्था असेल, याची खात्री होती. मात्र, १०-२० हजार कर्मचाऱ्यांपैकी १०-२० लोकांना गैरसोय होणं अपरिहार्य आहे. कदाचित मी त्या दहावीसपैकी एक असण्याची शक्यता गृहीत धरत, मी बॅग भरत होते.

मी मतदान अधिकारी क्रमांक तीन असल्याने बॅलेट सोडणे ही जबाबदारी माझी होती. तरीही, ही एक टीमवर्कची जबाबदारी असल्याने शाई लावण्याचं कामही सामायिक होतं. शाई अधिक लागल्यामुळे बोटाची कातडी निघण्याचा अनुभव लक्षात घेऊन, मी हँड ग्लोज बॅगमध्ये ठेवला. तो ठेवताना, विचार आला की ट्रेनिंगदरम्यान यावर चर्चा झाली होती आणि काही महिलांनी तयारी केली होती. मात्र इतरांचं काय? मग स्वतःला समजावलं की फर्स्ट एड किटमध्ये निश्चित हँड ग्लोज असेल.

तरीही, OPO 255 Phaltan Vidhan Sabha या साहेबांनी तयार केलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या ग्रुपवर मी विनंती केली, ‘साहित्याबरोबर शाई लावण्यासाठी हँड ग्लोज पुरवावेत.’ यानंतर कराडच्या एका शिक्षकाने विचारले, ‘साहित्य जमा करून परत येण्यासाठी बस आहे का?’ साहेबांनी तत्काळ ‘हो’ असा रिप्लाय दिला. माझं थोडं गिल्टी वाटलं की मी अगदी क्षुल्लक मागणी केली. पण नंतर विचार केला की निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही ड्युटी खूप काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याची असते.

निवडणुकीचा दिवस

आज सकाळी गोडाऊन हॉलजवळ भव्य मंडप उभा होता. रुचकर नाश्ता, पाण्याचे जार, चांगल्या क्वालिटीचं आयकार्ड, आणि प्रत्येक टीमसाठी स्वतंत्र बसायची व्यवस्था. गडबड-गोंधळ काहीच नव्हता. साहेब व्यासपीठावर उभे राहून आपल्याच सहजशैलीत बोलत होते, कधी धमकीचा दंडुका, तर कधी विनोदाची झालर! “टेन्शनने शुगर लेव्हल कमी झाली तर किटमध्ये लेमनच्या गोळ्या आहेत. त्या खा, पण जागा सोडू नका,” असं सांगणारे साहेब प्रत्येक कर्मचारी पूर्ण समाधानाने बूथकडे रवाना करत होते.

माझं बूथही प्राधान्याने ५ किमी अंतरावर मिळालं. बूथ मॅनेजमेंटचं साहित्य तपासताना, अचानक मला हँड ग्लोज दिसला. त्यावेळी मला झालेला आनंद केवळ हँड ग्लोजसाठी नव्हता, तर साहेबांच्या कर्तव्यदक्षतेसाठी होता. त्या कामप्रेमी, जबाबदार वृत्तीला माझा मनःपूर्वक सलाम!

शेवटी विंदा करंदीकरांच्या या ओळी मनात आल्या:
उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्यांची हात घ्यावे…

  • श्रीमती अहिल्या कृष्णात भोजने,
    उपशिक्षिका, जि.प. प्राथमिक शाळा भिवरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments