Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रदेश - परदेश: कोल्हापूरचे पोलंडसाठी योगदान

देश – परदेश: कोल्हापूरचे पोलंडसाठी योगदान

[ad_1]

ज्ञानेश्वर मुळे6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वळीवडेच्या पोलिश कॅम्पमध्ये तिरंगा आणि पोलंडचा ध्वज फडकावण्यात आला, तेव्हाचे संग्रहित छायाचित्र. (स्त्रोत : इंटरनेट)   

अस्थिर काळातही कोल्हापूर राजघराण्याने ५ हजार पोलिश नागरिकांचे तब्बल सहा वर्षे पालनपोषण केलेच, पण त्यांना घरच्यासारखी वागणूक दिली. हे सगळे केवढे कौतुकास्पद आहे! जामगनरमधले पोलिश नागरिक १९४६ मध्येच परतले, तर कोल्हापूरवासी पोलिश १९४८ पर्यंत राहिले.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शासकीय भेटीसाठी पोलंडला गेले होते. पोलंड – भारत संबंधामधला एक दुवा कोल्हापूरला येऊन पोहोचतो, याची बहुतेकांना कल्पना नाही. सुदैवाचा भाग असा की, भारतवासीयांना कदाचित पोलंड – भारत संबंधांतील कोल्हापूरच्या योगदानासंदर्भातील फारशी माहिती नसली, तरी पोलंडच्या जनतेने मात्र तिथे या मैत्रीचे सुंदर स्मारक बनवले आहे आणि ते उत्तम प्रकारे जतन केले जात आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अपरिमित हानी सोसलेल्या युरोपमध्ये स्मारकांचा योग्य सन्मान ठेवण्याची प्रथा आपल्या तुलनेने फारच चांगली आहे. या बाबतीत आपला उत्साह वाखाणण्यासारखा असला, तरी पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या निगराणीच्या बाबतीत आपण जयंती-पुण्यातिथी सोडल्यास उदासीनच असतो. स्मारक आणि पुतळ्यांना अनेकदा फक्त कावळे आणि कबुतरांची सोबत मिळते. असो.

पोलंडमधील या स्मारकाला पंतप्रधान मोदींनी भेट दिली आणि काही अंशी या महत्त्वाच्या प्रकरणाला राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पण, याचा इतिहास थोडक्यात का होईना, प्रत्येक मराठी माणसाला माहीत असणे आवश्यक आहे. एका अर्थाने महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील हे एक अभिमानास्पद पान आहे.

दुसऱ्या महायुद्धाची सुरूवातच मुळात सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मनीच्या पोलंडवरील स्वारीने झाली. पोलंडच्या संरक्षणासाठी फ्रान्स, इंग्लंड धावले. तिकडे रशिया आणि जर्मनीचा गुप्त करार असल्याने रशियाने पोलंडवर पूर्वेकडून हल्ला केला. पोलंडचा पराभव झाला. जर्मनी आणि रशियाने पोलंडची विभागणी केली व तो देश ताब्यात घेतला. त्यानंतर युद्ध पेटतच गेले. अनेक राष्ट्रे त्यात सामील झाली. जर्मनी आणि साथीदार राष्ट्रांनी १९४० ला रशियावरच हल्ला केला. रशियाला जर्मनीबरोबरचा करार रद्द करावा लागला. त्या आधी जर्मनीच्या साथीने पोलंडशी केलेल्या युद्धात हजारो पोलिश लोकांना अटक करुन सोव्हिएत युनियनमधील (रशिया) सैबेरियासह अनेक ठिकाणी पाठवण्यात आले होते. जर्मनीबरोबरच युद्ध सुरू झाल्यावर या पोलिश ओलिसांना आणि कैद्यांना अभय देण्यात आले. त्यातील पुरुषांना मित्र देशांच्या फौजांसाठी नाझी फौजांशी युद्ध करावे, म्हणून कॉककस भागात पाठवण्यात आले. पोलंडमध्ये परतण्यासारखी परिस्थिती नसल्याने स्त्रिया आणि मुलांना जे देश स्वीकारण्यास तयार असतील, त्या देशांत पाठवण्याचा प्रयत्न सुरू झाला. युद्धानंतर त्यांनी पोलंडला परत जावे, असे ठरवून ब्रिटिशांनी व्यापलेल्या भारतासह अन्य देशांना तसे आवाहन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर जामनगरचे राजे जामसाहेब यांनी ५०० पोलिश नागरिकांना आश्रय दिला. १९४२ ते ४६ पर्यंत ते जामनगरमध्ये वास्तव्य करुन राहिले. स्वत: जामसाहेब आदरातिथ्याच्या बाबतीत प्रसिद्ध होते हे जामनगर निवडण्याचे कारण असावेच; पण त्याचबरोबर त्यांच्या इंग्लंडभेटीत पोलंडच्या (निर्वासित) पंतप्रधानांनी त्यांना केलेली विनंती हेही होते. जामसाहेब हे तत्कालीन संस्थानिकांच्या मंडळाचे (नरेंद्र मंडल) प्रमुख होते, हे त्या विनंतीमागचे कारण होते.

जामनगरने पोलंडचे ५०० नागरिक, तर कोल्हापूरने ५००० नागरिक स्वीकारले. कोल्हापूरने दाखवलेल्या या औदार्याची मात्र जामनगरच्या तुलनेने फारशी दखल घेतली गेलेली नाही. एक तर त्यांना आलेली विनंती ही मुंबईतील पोलिश मुत्सद्द्याकडून आली असावी म्हणून आणि दुसरी गोष्ट, त्या काळात कोल्हापूरच्या संस्थानात राजघराण्यातील दोन दुर्दैवी मृत्यूंमुळे बऱ्यापैकी अस्थिर वातावरण होते. आधीच्या महाराजानंतर नवीन दत्तक राजपुत्र तरुण वयातच गेले, त्यानंतर आलेले राजे स्वत: नाझी फौजांविरुद्ध आफ्रिकेत लढत होते. अशा अस्थिर काळातही कोल्हापूर राजघराण्याने वळीवडे इथे कॅम्प उभारुन ५ हजार पोलिश नागरिकांचे तब्बल सहा वर्षे पालनपोषण केलेच, पण त्यांना घरच्यासारखी वागणूक दिली. हे सगळे केवढे कौतुकास्पद आहे! जामगनरमधले पोलिश नागरिक १९४६ मध्येच परतले, तर कोल्हापूरवासी पोलिश १९४८ पर्यंत राहिले.

या पोलिश नागरिकांना कोल्हापुरात मिळालेले आदरातिथ्य खरोखर वाखाणण्याजोगे होते. त्यांच्यासाठी तज्ज्ञ असलेले डॉक्टर आणि दवाखाना, मुलामुलींसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, त्यांच्यासाठी खास चर्चद्वारे धर्मपालनाची सोय; शिवाय पाचगणीला काही काळ नेण्याची व्यवस्था आणि कोल्हापूर शहरात राजवाड्याला भेट देण्याची व महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी परवानगी अशा या उत्तम व्यवस्थेमुळेच जेव्हा जामनगर कॅम्प बंद झाला, तेव्हा त्यातील काही ज्येष्ठ पोलिश लोकांचे कोल्हापूरला स्थलांतर करण्यात आले. या सर्व नैसर्गिक वातावरणामुळेच दोन पोलिश मुलींनी कोल्हापूरच्या स्थानिक युवकांशी प्रेमविवाह केला.

मोदींच्या पोलंड भेटीच्या निमित्ताने या सुंदर अशा कोल्हापूर पर्वावर लेख लिहिला. एका इंग्रजी दैनिकात तो प्रसिद्ध झाल्यावर पंतप्रधानांच्या वैयक्तिक एक्स अकाउंटवरुन त्यांनी तो पोस्ट केला. आज या सदराच्या निमित्ताने ही कहाणी महाराष्ट्रातील असंख्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. कोल्हापूरकर म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

(संपर्कः dmulay58@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments