Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रवेब वॉच: 'रौतू का राज' खिळवून ठेवणारी रहस्यकथा

वेब वॉच: ‘रौतू का राज’ खिळवून ठेवणारी रहस्यकथा

[ad_1]

सुहास किर्लोस्कर14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘रौतू का राज’मध्ये नवाजुद्दीनने इन्स्पेक्टर नेगीची व्यक्तिरेखा संयमितपणे साकारली आहे.

चित्रपट कोणत्या प्रकारचा आहे, हे कशावरून ठरते? तर त्याच्या कथेची – पटकथेची मांडणी, पात्ररचना, वेशभूषा, रंग-कॅमेरा-सेटिंग यावरून. ‘क्राइम’ या प्रकारातील चित्रपट गुन्ह्यांशी संबंधित असतात, ज्यामध्ये बँक रॉबरी, गँगस्टर टोळीच्या कारवाया, कोर्ट रूम ड्रामा, डिटेक्टिव्ह, मर्डर मिस्ट्री असे काही उप-प्रकार आहेत. क्राइम मिस्ट्री या प्रकारात गुन्ह्याचा शोध घेतला जातो. पण, गुन्हेगारी जग, त्यासंबंधी हाणामारी हे दाखवण्यात वेळ घालवण्यापेक्षा गुन्ह्याचा तपास कसा झाला, हे दाखवले जाते. आनंद सुरपूर दिग्दर्शित ‘रौतू का राज’ हा चित्रपट उत्तम मर्डर मिस्ट्री आहे, ज्यामध्ये ‘क्राइम’पेक्षा त्या गुन्ह्याच्या तपासाला अधिक महत्व दिले आहे.

मोबाइल वाजल्यामुळे इन्स्पेक्टर दीपक नेगी (नवाजुद्दीन सिद्दीकी) झोपेतून उठतो. अर्धवट झोपेत त्याला समजते की, मसुरीतील रौतू या शांत घाटीमध्ये असलेल्या अंध मुलांच्या शाळेतील वॉर्डन संगीता सकाळी मृतावस्थेत आढळल्या आहेत. इन्स्पेक्टर नेगी घटनास्थळी पोहोचतात, खुनाच्या संशयामुळे वॉर्डनच्या खोलीला कुलूप लावण्याचे आदेश देतात आणि गुन्ह्याचा तपास सुरू होतो. चित्रपटाने पहिल्या मिनिटापासून प्रेक्षकांची पकड घेणे ही आजच्या ओटीटीची गरज आहे, कारण वेळ वाया घालवल्यास प्रेक्षक त्यांच्या हातातल्या रिमोटचा वापर करतात. झी 5 वर रिलीज झालेला ‘रौतू का राज’ प्रेक्षकांना पहिल्या मिनिटापासून खिळवून ठेवतो. सस्पेन्स – मिस्ट्री चित्रपटात गुन्ह्याचे एकेक धागे ठराविक काळानंतर प्रेक्षकांपुढे उलगडणे, पण त्या संबंधी काही प्रश्न अनुत्तरित राहणे या तंत्राला Exposition म्हणतात. पटकथा लिहिताना, एकदम सगळी माहिती न सांगता कथेचे एकेक धागे उलगडत गेल्यास प्रेक्षकांना स्वतःच गुन्ह्याचा तपास केल्याचा आभास निर्माण होतो. ‘रौतू का राज’मध्ये पटकथेचे हे तंत्र प्रभावीपणे वापरले आहे.

इन्स्पेक्टर नेगीच्या दृष्टिकोनातून गुन्ह्याचे एकेक धागेदोरे सापडतात. कधी संवादातून, कधी मोबाइलवर शूट केलेल्या व्हिडिओमधून, तर कधी काही पात्रांच्या संशयास्पद वागण्यामधून गुन्ह्याची उकल होत राहते. ठराविक काळाने प्रेक्षकांना धक्के बसतात, तर काही वेळा कथेला वेगळे वळण मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या तोंडी एक महत्त्वाचे वाक्य आहे… ‘हमेशा वो मत देखो, जो दिखाया जा रहा है; वो देखो जो छुपाया जा रहा है..’ चित्रपट मिस्ट्री असला, तरी त्यामध्ये वारंवार हाणामारी नाही, गुन्हेगारांवर पोलिसांची धाड पडण्यासारखी दृश्ये नाहीत. कारण उत्तराखंडमधील त्या गावामध्ये गेल्या दशकात असा कोणताही गुन्हा घडलेला नाही. शरीक पटेल आणि आनंद सुरपूर यांनी पटकथा लिहिताना गुन्ह्यापेक्षा तपासाला अधिक महत्त्व दिले आहे. सुरपूर यांनी दिग्दर्शन करताना कथेची संयमित हाताळणी करीत काही सनसनाटी घडण्याला फाटा गेला आहे. चार जणांची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना ते प्रसंग आलटून पालटून दाखवताना मनीष जेटली यांनी उत्तम संकलन केले आहे. शांत घाटीमधील दिवस बदलल्याचे दाखवण्यासाठी अंधार – प्रकाशाच्या खेळाचा चांगला वापर केला आहे.

प्रत्येक चित्रपटाची एक लय असते. ‘बोर्न आयडेंटिटी’, ‘एक हसीना थी’ यांसारखे चित्रपट अतिशय वेगवान असतात. ‘जोराम’, ‘भोसले’ असे चित्रपट संथ लयीत असतात. कारण त्या त्या चित्रपटाची हाताळणी तशी करणे हीच खासियत असते. ‘रौतू का राज’ प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवणारा आहे, पण त्याला एक संथ लय आहे. कारण ही कथा एका शांत, डोंगराळ भागात घडते. चित्रपटाची ही लय ओळखून दणदणाट करणारे ड्रामेबाज पार्श्वसंगीत इथे टाळण्यात आले आहे. गाणी नसल्यामुळे चित्रपटाच्या कथेवर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होते, हे अलीकडच्या चित्रपटांचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

नवाजुद्दीन सिद्दीकीने इन्स्पेक्टर नेगी अत्यंत संयमितपणे साकारला आहे. ‘मिलन मिलन मिलन… आपको समझ में नहीं आ रहा?’ असे ओरडून सांगणारा ‘कहानी”मधला त्याचा इन्स्पेक्टर वेगळा, ‘रात अकेली हैं’ चित्रपटातला इन्स्पेक्टर वेगळा, ‘मॉम’मधला डिटेक्टिव्ह वेगळा आणि ‘रौतू का राज’मधला इन्स्पेक्टर या सर्व पात्रांच्या स्वभावापेक्षा हटके आहे. राजेश कुमार, अतुल तिवारी, समृद्धी चंडोला यांचा अभिनय कथानकाच्या मागणीनुसार आहे.

पोलिस खात्याचा कारभार वरून येणाऱ्या आदेशानुसार चालतो. राजकारणी पोलिसांना वापरतात, त्यांना आदेश देत असतात. पोलिसांना गुन्ह्याचा तपास राजकारणी लोकांना सांभाळून करावा लागतो, हे आपल्या देशात सगळीकडेच दिसते. त्याचेच प्रतिबिंब या चित्रपटातही दिसते. इन्स्पेक्टर नेगी उपलब्ध असलेल्या स्टाफकडून काम करून घेतो, पण तपास करताना त्याला आदेश देणाऱ्या साहेबाला ‘येस्सर’ म्हणून आपल्या पद्धतीने काम करावे लागते. व्यक्तिगत आयुष्य आणि पोलिसांची नोकरी यांतील तणाव सांभाळून गुन्ह्याच्या तपासामध्ये उत्तम कामगिरी करण्याचे आव्हान इन्स्पेक्टर कसे पेलतात, हे नवाजुद्दीने देहबोली, संवाद आणि नजरेच्या माध्यमातून उत्तमरीत्या दाखवले आहे. त्याच्या संयमित अभिनयासाठी तरी हा चित्रपट बघायलाच हवा.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments