Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: 'टी. एन. कौल' करारकुशल राजनयिक अधिकारी

वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘टी. एन. कौल’ करारकुशल राजनयिक अधिकारी

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

विसाव्या शतकातील भारतीय मुत्सद्देगिरीचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्रिलोकी नाथ (टी. एन.) कौल यांचा उल्लेख करावा लागेल. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सगळ्या देशांमध्ये राजनयिक अधिकारी म्हणून काम करणे, ही कौल यांची जमेची बाजू होती. १९३९ मध्ये ब्रिटिश राजवटीत नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यांनतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेऐवजी भारतीय परराष्ट्र धोरणाला प्राधान्य दिले. अमेरिका, सोव्हिएत महासंघ आणि चीनमध्ये राजदूत, युनायटेड किंगड्ममध्ये उपउच्चायुक्त, भारताचे परराष्ट्र सचिव, ‘युनेस्को’मध्ये उपसभापती आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष इतका प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी होता. या अनुभवसंपन्न कारकिर्दीनेच त्यांना ‘करारकुशल’ राजनयिक अधिकारी बनवले.

परराष्ट्र धोरणात कराराचे महत्त्व अनन्यसाधारण असते. किंबहुना करार हाच मुत्सद्देगिरीचा प्राण असतो. दोन देशांतील करार हे जसे युद्धाचे कारण बनू शकते, त्याप्रमाणे करारामुळे शांतताही प्रस्थापित होऊ शकते. उदाहरणार्थ, जगप्रसिद्ध ‘व्हर्सायचा करार’. या करारामुळे पहिले महायुद्ध संपुष्टात आले, परंतु या करारातील जाचक अटींमुळे हिटलरच्या नाझीवादाचा तर जन्म झालाच; शिवाय जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागले. या अर्थाने करार ही दुधारी तलवार असते. या तलवारीचा वापर कसा करायचा, हे मुत्साद्द्यांच्या कौशल्यावर अवलंबून असते. त्रिलोकीनाथ कौल यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर हे कौशल्य प्राप्त केले होते. भारत-चीन यांच्यातील ‘पंचशील करार’ आणि भारत-पाकिस्तानमधील ‘सिमला करार’ या भारतीय इतिहासातील सर्वांत चर्चित करारांमागे कौल यांची प्रमुख भूमिका राहिली आहे.

भारत-रशिया संबंधाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचे श्रेय हे निश्चितपणे कौल यांचेच. तरुण अधिकारी असल्यापासूनच त्यांचा ओढा भारत – रशिया संबंध बळकट करण्याकडे होता. हे वाचून आश्चर्य वाटेल, पण रशियाशी संबंध दृढ करण्याविषयी कौल यांनी दिलेल्या सल्ल्यांकडे पं. नेहरूंनी दुर्लक्ष केले होते. नेहरूंचा कल चीनशी संबंध सुधारण्याकडे होता. रशियाशी संबंध सुधारण्याचा कौल यांचा आग्रह असल्याची जाणीव अमेरिकेलाही होती. १९७३ मध्ये इंदिरा गांधींनी कौल यांची अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून केलेली नियुक्ती अमेरिकेला रुचली नव्हती. त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य डॅनिएल मॉयनिहॅन यांनी कठोर शब्दांत टीका केली होती. १९७१ नंतर भारतीय परराष्ट्र धोरणात झालेले बदल आणि अमेरिकेबरोबर ताणलेले संबंध पाहता, अमेरिकेला इशारा देण्यासाठी इंदिरा गांधींनी कौल यांच्या रूपाने आपला हुकमी एक्का वापरला होता.

आपल्या कारकिर्दीत कौल यांनी दोन वेळा सोव्हिएत महासंघात भारताचे राजदूत म्हणून काम केले. प्रथम १९६२-६६ मध्ये, जेव्हा शीतयुद्धाची दाहकता सर्वात जास्त होती आणि नंतर १९८६-८९ मध्ये, जेव्हा सोव्हिएत साम्राज्य विघटनाच्या उंबरठ्यावर होते. या कालावधीत भारत-सोव्हिएत संबंध राजकारणापर्यंत मर्यादित न ठेवता कौल यांनी त्याला सांस्कृतिक आयामही दिले. पंतप्रधान मोदींनी नुकत्याच केलेल्या रशिया दौऱ्यात ‘सर्वकालीन सर्वश्रेष्ठ मित्र’ म्हणून काढलेल्या उद्गारामागे कौल यांनी त्या देशासोबतचे संबंध दृढ करण्यात दाखवलेली दूरदृष्टी आहे, हे नाकारता येणार नाही.

भारतीय परराष्ट्र धोरणातील ऐतिहासिक करार असो अथवा रशिया-भारत संबंधाची पायाभरणी असो; कौल यांची कारकीर्द नेहमीच अनुकरणीय राहिली आहे. तथापि, त्यांच्या कारकिर्दीला लागलेला डाग हा मुत्सद्द्यांनी काय करू नये, याचा धडा देखील आहे. सार्वजनिक आणि महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य असा भेद करता येत नाही, या साध्या शिकवणीचा विसर कौल यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीला पडला. १३ मार्च १९५४ रोजी एन. टी. पिलाई यांनी पं. नेहरुंना पत्र लिहून कौल यांचे चिनी महिलेशी संबंध असल्याचे कळवले होते. १९५४ मधील भारत-चीन यांच्यातील करारामागे कौल यांची महत्त्वाची भूमिका पाहता, हा ‘हनी ट्रॅप’ असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या आरोपानंतर कौल यांना माघारी बोलवण्यात आले. या प्रकरणानंतर त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली असली, तरीही त्यांच्या दैदीप्यमान कारकीर्दीवर पडलेला हा डागही पुढच्या पिढीतील मुत्सद्द्यांना बरेच काही शिकवणारा होता.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments