रसिक स्पेशल: सत्संगाला अविवेकाचे ग्रहण!

0
27
रसिक स्पेशल:  सत्संगाला अविवेकाचे ग्रहण!




धार्मिक श्रद्धा प्रबळ असलेल्या आपल्या देशात सामान्यांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यातून निष्पापांचे बळी जाण्याच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रत्येकाला आपला विवेक जागा ठेवावा लागेल. अशा दुर्घटना टाळण्याची आणि त्यांना जबाबदार असणाऱ्यांना प्रतिष्ठा न देण्याच्या संकल्पाची हीच खरी सुरूवात असेल. उत्तर प्रदेशात हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १२३ लोकांचा बळी गेला. ही शोकांतिका दीर्घकाळ विसरता येणार नाही. पूर्वाश्रमीचा पोलिस कर्मचारी असलेल्या नारायण साकार हरी उर्फ भोलेबाबाच्या सत्संगावेळी ही दुर्घटना घडली. या बाबावर पूर्वी काही गुन्हे दाखल झाले होते आणि त्यात त्याला तुरुंगवासही झाला होता. असा माणूस काही वर्षांनी धार्मिक, आध्यात्मिक गुरू म्हणून लोकांच्या समोर येतो आणि त्याच्या सत्संगाला हजारोंची गर्दी जमते, ही गोष्टच मुळी सुज्ञ लोकांच्या पचनी पडणार नाही. अशा प्रसंगी गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन मोठी दुर्घटना होणे, हे आपल्या सार्वजनिक व्यवस्थेचे आणि कायदा-सुव्यवस्था यंत्रणांचे अपयश तर आहेच; पण लोकशाहीच्या दीर्घ वाटचालीत आपण सामाजिक विवेक जागृत करण्यात अयशस्वी ठरलो, हे सिद्ध करणारेही आहे. देशातील बहुतांश सामान्यजनांना आपण अजूनही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगू शकलो नाही, हेच अशा दुर्घटनांमधून अधोरेखित होते. नियोजनाचा अक्षम्य अभाव हाथरसमधील या सत्संगासाठी पोलिसांनी ७५ ते ८० हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. तथापि, प्रत्यक्षात अडीच लाख लोक जमले. हे सगळे भक्तच असणार आणि भोलेबाबाचा पदस्पर्श वा दर्शन मिळावे, अशी त्या सर्वांची भावना असणार, हे स्पष्टच होते. त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवणे, लोकांच्या येण्याचे आणि बाहेर पडण्याचे मार्ग सुनिश्चित करणे, वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्था, आपत्कालीन मदत-बचाव यंत्रणा, उपचार सुविधांची सज्जता यांसाठी पोलिस-प्रशासनाने अत्यंत काटेकोर नियोजन करणे आवश्यक होते. पण, इथे यातील बहुतांश गोष्टी झाल्याच नाहीत. येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरुन तरी पोलिसांना संभाव्य गर्दीचा अंदाज यायला हवा होता. शिवाय, आता सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोन कॅमेरे अशी आधुनिक साधने दिमतीला असतानाही दुर्घटना टळत नसतील, तर ते या यंत्रणेचे मोठे अपयश मानावे लागेल. निरपराधांच्या जीवाला मोल नाही? अशा दुर्घटनांनंतर राज्य, केंद्र सरकार लगेच दोन – पाच लाखांची मदत जाहीर करते. आपत्तीच्या प्रसंगी तातडीचे सहाय्य देणे ही सरकारची जबाबदारी असते म्हणून हे ठीक मानले, तरी यातून संबंधित आप्तांच्या वाट्याला आलेले दु:ख, वेदना कमी होत नाहीत. खरे तर, आर्थिक मदतीइतकीच तत्परता अशा घटनेला जबाबदार असलेल्यांना तत्काळ गजाआड करण्यात दाखवली पाहिजे. हाथरसच्या घटनेनंतर तीन दिवसांनी या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली. भोलेबाबा तर हाती लागलाच नाही. ज्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन सव्वाशेवर लोकांचा जीव जातो, तो बाबा सगळी संसाधने हाती असताना पोलिसांना सापडत नाही, हे कुणालाही पटणार नाही. त्यामुळेच भोलेबाबाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातही संबंधितांना मोकाट सोडले जाणार असेल, तर देशात निरपराध लोकांच्या जीवाची काही किंमत उरली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. गर्दी करताना सारासार विवेक हवा आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे, अशा सत्संगाच्या कार्यक्रमात वा अन्य धार्मिक आयोजनाच्या वेळी काही दुर्घटना घडली, तर तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला वर्गातील अनेक भगिनी मृत्युमुखी पडतात. हाथरसच्या घटनेतील १२३ मृतांमध्ये ११३ महिला आणि ७ मुलांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे खारघर येथे पुरस्कार सोहळ्याच्या वेळी उष्माघात होऊन १४ जणांचा बळी गेला होता. त्यातही १० महिला होत्या. महिला या सामान्यत: अधिक सश्रद्ध असतात, हे आपण जाणतोच. मात्र, ही श्रद्धा डोळस असली पाहिजे. ती तशी नसल्यानेच अनेक भोंदू बाबा-बुवांचे फावते. मनोकामनापूर्तीसाठी नवससायास किंवा धार्मिक, आध्यात्मिक आधार नसलेल्या साधना, उपाय करणाऱ्यांमध्ये सुशिक्षित महिलांचेही प्रमाण मोठे आहे. कुठे, किती गर्दी करायची याचा सारासार विवेक भाविक म्हणवणारा वर्ग गमावून बसतो आणि त्यातूनच मग मांढरदेवी यात्रेपासून कुंभमेळ्यापर्यंत अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडतात, शेकडो भाबड्या लोकांचे नाहक बळी जातात. श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धेची धूळ मस्तकी लावण्यासाठी धाव घेतली की अशा पावलांखाली आपणच चिरडले जातो, हेच अशा घटनांतून सिद्ध होते. समाजाची जागरुकताही महत्त्वाची मानसिक, भावनिक आधाराच्या शोधात असलेले, रोजच्या जीवन संघर्षाने पीडित झालेले लोक मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणांकडे आकर्षित होतात. कुठे तरी नाडली गेलेली सामान्य माणसे आधी अशा कुणा बाबाच्या प्रभावाखाली येतात. पुढे हळूहळू गर्दी आणि त्यांचे प्रभावक्षेत्रही वाढत जाते. त्यातून निखळ भक्तीचा आणि मानसिक शांतीचा उद्देश साध्य होत असेल, तर त्याला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण, श्रद्धेपोटी जमलेल्या भाबड्या लोकांना अंधश्रद्ध बनवण्याचा, त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार होत असेल, तर तिथे जागरुक समाज म्हणून विरोध केलाच पाहिजे. बुवाबाजी, हातचलाखी करणाऱ्यांवर प्रहार करणारे असे अभियान नरेंद्र दाभोलकरांनी पुण्यात सुरू केले होते. नंतर राज्यभर अशा अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती झाली. पुढे महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा आला. राष्ट्रीय स्तरावरही अशा कायद्याची गरज असल्याचे आता हाथरस दुर्घटनेनंतर अधोरेखित झाले आहे. धार्मिक श्रद्धा प्रबळ असलेल्या आपल्या देशात सामान्यांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्यासाठी, त्यांचे शोषण थांबवण्यासाठी आणि त्यातून निष्पाप लोकांचे बळी जाण्याच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रत्येकाला आपला विवेक जागा ठेवावा लागेल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याची आणि त्यांना जबाबदार असणाऱ्यांना प्रतिष्ठा न देण्याच्या संकल्पाची हीच खरी सुरूवात असेल. (संपर्कः arunbk1954@gmail.com)



Source link