Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रदेश - परदेश: परराष्ट्र धोरणाचा ‘अर्थ’दूत

देश – परदेश: परराष्ट्र धोरणाचा ‘अर्थ’दूत

[ad_1]

ज्ञानेश्वर मुळे9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पूर्वी भारताच्या पारंपरिक परराष्ट्र धोरणाचा कल आर्थिक संबंधांपेक्षा राजकीय संबंधांकडेच अधिक होता. पण, आर्थिक मुत्सद्देगिरीला राजकीय संबंधांपेक्षा जास्त महत्त्वाचे मानणाऱ्या मोजक्या राजदूतांमध्ये अर्जुन असरानींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. आज भारत-जपान आर्थिक संबंध परमोच्चबिंदूवर पोहोचले आहेत, त्याची पायाभरणी असरानी यांनीच केली होती.

असरानी नावाच्या सिनेक्षेत्रातील कलाकाराचे नाव मला परिचित होते. प्रेक्षकांना हसवण्याची उत्तम कला त्यांच्याकडे होती. जपानची राजधानी टोकियोमध्ये काम करीत असताना, ‘असरानी नावाचे राजदूत लवकरच सूत्रे घेणार,’ असे ऐकले आणि आम्हाला हसू आले. अर्थातच हे ते असरानी नव्हते. अर्जुन असरानी असे त्यांचे नाव. मात्र, विनोदाच्या बाबतीत तेही काही कमी नव्हते. फक्त त्यांची शैली नर्मविनोदाची होती. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेतून प्रवाहित होणारे विनोद ऐकणाऱ्याला काही वेळ तरी विचार करायला लावत अन् त्यानंतर मात्र हसून पुरेवाट होत असे.

माझ्या ३६ वर्षांच्या परराष्ट्र सेवेत मी साधारणत: ९-१० राजदूतांच्या हाताखाली काम केले आणि त्याहून अधिक राजदूतांच्या संपर्कात येऊन त्यांचे व्यक्तित्व समजून घेतले. पण, या सर्वांहून वेगळा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत ज्यांचा माझ्यावर सर्वांत जास्त प्रभाव पडला, ते होते राजदूत अर्जुन असरानी. मुख्य म्हणजे, परराष्ट्र सेवेतील पहिल्याच पोस्टिंगमध्ये ते मला राजदूत म्हणून लाभले. त्यांच्या आधी त्या पोस्टिंगमध्ये मला के. पी. एस. मेनन (ज्यु.) आणि ए. माधवन या दोन राजदूतांसोबत अल्पकाळासाठी काम करता आले. हे दोघेही परराष्ट्र धोरणातील दिग्गज, गाढे अभ्यासक; पण स्वभावाने गंभीर. कार्यालयीन कामाच्या पलीकडे संवाद साधणे मात्र कधी जमले नाही. परराष्ट्र धोरण – राजकारणाच्या क्षेत्रात एकदम नवख्या असलेल्या मला कुणीतरी माझ्या पातळीवर खाली येऊन मार्गदर्शन करणाऱ्या राजदूताची आंतरिक गरज होती. ती पूर्ण होण्यासाठीच जणू अर्जुन असरानी राजदूत म्हणून आले.

गौरवर्ण, थोडेसे स्थूल, सर्वसाधारण उंची अन् सामान्यपणे सुटाबुटात असा नीटनेटका पोशाख असे त्यांचे एकूण व्यक्तिमत्व. तोंडातील पाइपला डाव्या हाताचा टेकू देत ते धूर आत घ्यायचे नि मग हळूहळू तो बाहेर सोडायचे. या दरम्यान संवादही चालायचा. सतत हसतमुख. तल्लख नजर आणि निरीक्षणे. बोलता बोलता परराष्ट्र धोरणातील बारकावे समजावून सांगायचे. त्यांच्या तोंडून जपानचा इतिहास, जपान-चीन, जपान-कोरिया, जपान-अमेरिका, जपान-भारत संबंधांविषयी ऐकताना ते गंभीर विषयावर बोलत आहेत असे कधीच वाटत नसे. अधूनमधून स्वत:च्या अनुभवाचे बोल, किस्से ऐकवत संवादात रंग भरण्याची आगळी कला त्यांच्याकडे होती.

ते १९८० चे दशक होते. भारत अजूनही आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर आलेला नव्हता. खरे तर १९८९ च्या आसपास भारताची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली होती. भारताने परदेशांतील दूतावासांच्या मौल्यवान इमारती विकाव्यात आणि परकीय चलनात आलेली तूट भरून काढावी, असा विचारप्रवाह सुरू होता. अशावेळी राजदूत असरानी यांनी आपल्या चाणक्यनीतीचा वापर करुन जपानी सरकारकडून देशाला ५०० दशलक्ष डॉलरचे अर्थसाह्य मिळवून दिले. त्यामुळे भारतातील परकीय चलनाची तूट बऱ्यापैकी कमी झाली.

पूर्वी भारताच्या पारंपरिक परराष्ट्र धोरणाचा कल आर्थिक संबंधांपेक्षा राजकीय संबंधांकडे अधिक होता. पण, आर्थिक मुत्सद्देगिरीला राजकीय संबंधांपेक्षा काकणभर जास्त महत्त्वाचे मानणाऱ्या मोजक्या राजदूतांमध्ये अर्जुन असरानींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. जपान आणि भारत यांच्या पारंपरिक संबंधांतील बौद्ध विचार, नेताजी सुभाषचंद्र बोस, पं. नेहरुंची जपान भेट अशा पार्श्वभूमीचा वापर व्यापारी संबंध वाढवण्याकडे करुन असरानींनी नव्या आर्थिक मुत्सद्देगिरीचा प्रारंभ केला. त्यांच्या मृदू बोलण्यामागील कठोर मुत्सद्देगिरीचा परिणाम म्हणून त्यांचे जपानमधील प्रमुख उद्योगांच्या (उदा. मित्सुबिशी, मित्सुई, टोयोटा, सुझुकी) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध प्रस्थापित झाले. आज भारत-जपान आर्थिक संबंध परमोच्चबिंदूवर पोहोचले आहेत, त्याची पायाभरणी असरानी यांनी केली होती.

असरानींचा मुत्सद्देगिरीचा अनुभव विशाल होता. अमेरिका, थायलंड, पॅलेस्टाइन अशा विविध देशांमध्ये त्यांनी काम केले आणि त्या त्या देशातील लोकांबरोबर त्यांनी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले. पण, त्यांचे खरे प्रेम जपानवरच होते. जपानमध्ये त्यांनी एक तरुण अधिकारी म्हणून, नंतर मध्यम पातळीवर आणि मग राजदूत म्हणून असे तीनदा कार्य केले. जपानमधूनच सुरूवात करून ते तेथूनच निवृत्त झाले, हा केवळ योगायोग नसावा. जपानमधून भारतात परत आल्यावर त्यांनी जपानवर प्रेम करणाऱ्यांचा ‘टोकियो क्लब’ स्थापन केला. जपानच्या सम्राटांनी असरानी यांच्या योगदानाबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला.

अशा या अत्यंत मनमिळावू आणि तितक्याच कार्यक्षम राजदूताचे दिल्लीत नुकतेच निधन झाले. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली! ते माझे केवळ प्रेरणास्थानच नव्हते, तर मुत्सद्देगिरी आणि मानवी संबंध यांचा सुरेख मेळ घालण्याची शिकवणूक देणारे गुरू होते.

(संपर्कः dmulay58@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments