सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला मिळाली दिशा; कौटुंबिक वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न
शिरवळ : राजेवाडी परिसरातील रस्त्यालगत १४ सप्टेंबर रोजी बेवारस अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, घटनास्थळापासून सातारा-पुणे महामार्गापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाचा माग काढला. त्यानंतर या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले असून मृत तरुणीची ओळख हर्षदा हणुमंत जाधव (वय १९, रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) अशी पटली आहे.
या प्रकरणी हर्षदाचे वडील हणुमंत दामोदर जाधव आणि चुलते बाळू अंकुश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१४ सप्टेंबर रोजी शिरवळ-राजेवाडी मार्गावरील निर्जन परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला शिरवळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी घातपाताच्या शक्यतेने तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने तपासासमोर आणखी मोठे आव्हान निर्माण झाले होते.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरासह शिरवळ ते पुणे या मार्गावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पुणे, भोर, कापूरहोळ, नसरापूर तसेच सातारा-पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल छाननी करण्यात आली. या तपासातून संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका वाहनाचा माग पोलिसांना मिळाला.
यानंतर तांत्रिक तपास, वाहनाची माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीद्वारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. सलग तपासानंतर मृत तरुणीची ओळख हर्षदा जाधव अशी पटविण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक वादातून हर्षदा जाधव हिचा खून झाल्याचे समोर आले आहे. हर्षदाला बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने वडील आणि चुलत्याने वाहनातून नेले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत व तोंडात चटणी टाकून तोंड-नाक दाबून तिचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर तिचा मृतदेह राजेवाडी परिसरात आणून टाकण्यात आल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या पथकाने सलग १६ दिवस तपास करून प्रकरणाचा छडा लावला.
या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.
