Thursday, October 1, 2026
HomeUncategorizedसातारा जिल्हा बँक निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर मैदानात; रामराजेंसमोर थेट आव्हान

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर मैदानात; रामराजेंसमोर थेट आव्हान

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; फलटणच्या राजकारणासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष निवडणुकीकडे

सातारा | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे फलटणसह सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून २१ संचालक पदांसाठी १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान आणि ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आधीच आव्हान

दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या निवडणुकीसाठी दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था तसेच विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी श्रीमंत  रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे आता दोन्ही नाईक-निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकांकडे विशेष लक्ष लागले आहे.

फलटणच्या राजकारणाचे पडसाद जिल्हा बँकेत?

फलटण तालुक्यात गेल्या काही काळापासून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष चर्चेत राहिला आहे. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या राजकीय स्पर्धेचा प्रभाव सहकार क्षेत्रातील निवडणुकीवर कितपत पडतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

महायुतीच्या समीकरणांकडेही लक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याने महायुतीतील जागावाटप आणि संभाव्य पॅनेलची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे आमदार अतुल भोसले यांनीही रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मतदारसंघातून अर्ज दाखल केला असून अंतिम उमेदवारीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा बँकेची निवडणूक विकासाला प्राधान्य देत महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.

सातारा जिल्ह्याचे लक्ष

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक अधिक चर्चेत आली आहे. मात्र अंतिम चित्र उमेदवारी अर्जांची छाननी, माघारीची प्रक्रिया आणि पॅनेलची रचना स्पष्ट झाल्यानंतरच समोर येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची ठरणार का, कोणत्या मतदारसंघात कोणती राजकीय समीकरणे आकार घेणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments