🏆 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकडचा दणदणीत विजय; विभागीय स्पर्धेत करणार पुणे जिल्ह्याचे नेतृत्व
बोराटवाडी | प्रतिनिधी : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा संचलित लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी येथील विद्यार्थी पृथ्वीराज हनुमंत मारकड याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
पृथ्वीराज मारकड याने १९ वर्षे वयोगटातील ग्रीक-रोमन कुस्ती प्रकाराच्या ६० किलो वजनी गटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळविले. या यशामुळे त्याची आगामी विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
पृथ्वीराज याला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सदाशिव सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.
त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत कोकाटे यांनी माहिती दिली व अभिनंदन केले. तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मनोजराव पाटील, माजी सचिव किरणराव पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी, संस्थेचे संचालक मंडळ, ग्रामस्थ, पालक आणि विद्यालयातील शिक्षकवृंद यांनी पृथ्वीराजचे कौतुक करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पृथ्वीराजच्या या यशामुळे बोराटवाडी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, विभागीय स्पर्धेतही तो दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
