पुणे प्रतिनिधी : रात्रीची वेळ… एका नामांकित शासकीय रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. बाळाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने विशेष रक्तघटक देणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या परिस्थितीमुळे बाळाच्या आई-वडिलांसह नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
बाळासाठी आवश्यक रक्तघटक मिळविण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी धावपळ सुरू केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने आवश्यक रक्तघटक उपलब्ध होणे कठीण जात होते. याच दरम्यान रात्री सुमारे दोन वाजता बाळाच्या वडिलांच्या मित्राने सामाजिक कार्यासाठी परिचित असलेल्या राहुल सिद्धार्थ साळवे यांच्याशी संपर्क साधला.
फोन आल्यानंतर राहुल यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच बाळाच्या उपचारासाठी आवश्यक रक्तघटक उपलब्ध झाला आणि डॉक्टरांनी बाळावर तातडीने उपचार सुरू केले.
काही क्षणांपूर्वी उपचारासाठी आवश्यक रक्तघटक मिळेल की नाही, या चिंतेत असलेल्या कुटुंबाला राहुल यांच्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला. संकटाच्या काळात धावून येत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीची आणि माणुसकीची प्रचिती दिली.
गेल्या १६ वर्षांपासून स्वतः दुःख आणि वेदनांशी दोन हात करत असतानाही रक्तदान व सामाजिक कार्याच्या माध्यमातून इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे राहुल सिद्धार्थ साळवे यांना अनेक जण प्रेमाने आणि आदराने ‘रक्ताचा माणूस’ म्हणून संबोधतात.
यापूर्वीदेखील अनेक गरजू रुग्णांना रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना कठीण प्रसंगी आधार मिळाला आहे.
संकटाच्या क्षणी कोणताही स्वार्थ न ठेवता मदतीसाठी पुढे येणारी माणसं समाजासाठी आशेचा किरण ठरतात. राहुल सिद्धार्थ साळवे यांचे कार्यही याच माणुसकीचे उदाहरण आहे. नवजात बाळाच्या उपचारासाठी मध्यरात्री केलेली ही मदत त्यांच्या सामाजिक जाणीवेची पुन्हा एकदा प्रचिती देणारी ठरली.
नवजात बाळाच्या जीवासाठी आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध करून देत राहुल सिद्धार्थ साळवे यांनी पुन्हा एकदा ‘रक्ताचा माणूस’ ही ओळख सार्थ ठरवली. त्यांच्या सामाजिक कार्याला आणि माणुसकीला मनापासून सलाम!
सोर्स : साहस न्यूज
