शिरवळच्या लयनगिरी बुद्ध लेणीवर १००० वर्षांनंतर भाद्रपद पौर्णिमा उत्साहात साजरी
बुद्ध लेणी संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने लक्ष द्यावे : कार्यशाळेत मागणी
शिरवळ : शिरवळ येथील पांडवदरा परिसरातील प्राचीन लयनगिरी बुद्ध लेणीवर तब्बल १००० वर्षांनंतर प्रथमच भाद्रपद पौर्णिमा साजरी करण्यात आली. बौद्ध युवा जागृती परिषद, कराड, सह्याद्री लेणी संवर्धक समूह, वाई आणि भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने लयनगिरी बुद्ध लेणीवर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुद्धवंदना, लेणी अभ्यास आणि संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना रोहित वाघमारे यांनी लयनगिरी बुद्ध लेणीच्या ऐतिहासिक व बौद्ध वारशाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, शिरवळच्या पांडवदऱ्यातील लयनगिरी बुद्ध लेणी हा प्राचीन बौद्धकालीन वारसा असून, येथे सुमारे १७ लेण्यांचा समूह आहे. यातील एका लेणीत चैत्यस्तूप असून, त्यामध्ये जोत, मेदी, वेदिकापट्टी, अंड, हार्मिका, पेटी, छत्र, छत्रावली आणि छत्रयष्टी असे वास्तुघटक आढळतात.
या लेणीसमूहात चैत्यगृह, चैत्यस्तूप, चैत्यविहार, शून्यागार, ध्यानकक्ष आणि पाण्याची पोडी यांसारख्या वास्तूंचे अवशेष आढळतात. बौद्ध स्थापत्यामध्ये चैत्यस्तूप, शारीरिक स्तूप, धम्मेक स्तूप, परिभोगिक स्तूप आणि ओटीव स्तूप असे विविध प्रकार आढळतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
लयनगिरी बुद्ध लेणीचा ऐतिहासिक संदर्भ देताना वाघमारे यांनी सांगितले की, भोर संस्थानच्या तत्कालीन वस्तुसंग्रहालयातील ताम्रपटात या बौद्ध लेण्यांचा उल्लेख आढळतो. राष्ट्रकूट वंशातील ध्रुव राजाने इ.स. ७८० मध्ये दिलेल्या ताम्रपटात या लेणीचा संदर्भ असल्याचे सांगण्यात आले. तसेच सदाशिव आत्माराम जोगळेकर यांच्या १९५२ मधील ‘सह्याद्री’ या पुस्तकातही या बुद्ध लेण्यांचा उल्लेख आहे. या डोंगराला ‘लयनगिरी’ तर शिरवळ गावाला ‘श्रीमाळ, श्रीवलय, सिरीवलय’ अशा नावांनी ओळखले जात असल्याचा संदर्भ त्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.
इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकादरम्यान हा तीन मजली लेणीसमूह कोरला गेला असावा, असे अभ्यासकांचे मत असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले. पुढील काळात या परिसरात शिवपिंड बसविल्याचेही दिसून येते. शिवपिंडीच्या शेजारीच चैत्यस्तूप आणि चैत्यगृह असून, पुढील चैत्यविहारात बौद्ध भिक्खूंसाठी आठ खोल्या कोरलेल्या आहेत. लेण्यांच्या वरील भागात मोठ्या आकाराचे चैत्यविहार असून, तेथे पाणी अडल्यामुळे धोकादायक पाणीसाठा निर्माण झाला आहे.
दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या प्राचीन बुद्ध लेणीचे तातडीने जतन व संवर्धन करण्याची गरज आहे. सध्या लेण्यांमध्ये दगड, माती आणि झुडपांचे प्रमाण वाढले असून, पुरातत्त्वीय वास्तूंची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र अथवा राज्य पुरातत्त्व विभागासह संबंधित शासकीय विभागांनी या लेण्यांची जबाबदारी स्वीकारून नियमित देखभाल व संवर्धन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी केली.
या कार्यशाळेची कैलास कांबळे (कराड) आणि रोहित वाघमारे (वाई) यांनी धुरा सांभाळली. भारतीय बौद्ध महासभेचे खंडाळा तालुका अध्यक्ष संजय जाधव, वाई तालुका अध्यक्ष महादेव शेलार, सह्याद्री लेणी संवर्धक समूहाचे संस्थापक अध्यक्ष अक्षय कांबळे तसेच कार्यकर्त्यांनी महिनाभर जनजागृती व प्रचार-प्रसार केला.
शिरवळ येथील राजे सिद्धार्थ तरुण मंडळाच्या किरण कांबळे, विकी कांबळे, लोकेश कांबळे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी सुमारे ४०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली. कार्यक्रमाला पोलीस प्रशासनासह सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लयनगिरी बुद्ध लेणीवरील भाद्रपद पौर्णिमेचा हा उपक्रम प्राचीन बौद्ध वारशाकडे नव्याने लक्ष वेधणारा ठरला असून, या ऐतिहासिक लेणीसमूहाच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभागाची गरज व्यक्त करण्यात आली.
