चिमुकल्यांचा निरागस आग्रह अन् खासदारांची प्रेमळ भेट; दत्तनगरच्या गणेश मंडळातील मुलांची अनोखी कहाणी
फलटण | प्रतिनिधी : फलटण शहरातील दत्तनगर परिसरातील चिमुकल्या मुलांनी आपल्या गणेश मंडळासाठी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि आग्रह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या गणेश मंडळाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट द्यावी, अशी इच्छा या मुलांच्या मनात होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी थेट खासदारांच्या निवासस्थानी जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
घरातील मोठ्यांना न सांगता या चिमुकल्यांनी स्वतः रिक्षा करून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर धाव घेतली. तेथे जाऊन त्यांनी आपल्या गणेश मंडळाला भेट देण्याची विनंती केली. मुलांचा निरागस आग्रह आणि आपल्या मंडळाविषयी असलेली आस्था पाहून खासदारांनीही त्यांच्या भावनेचा मान ठेवत दत्तनगर येथील गणेश मंडळाला भेट दिली.
खासदारांनी चिमुकल्यांच्या आग्रहाला प्रतिसाद देत त्यांच्या गणेश मंडळाला दिलेली ही भेट मुलांसाठी निश्चितच आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरली. मोठ्या व्यक्तीसमोर आत्मविश्वासाने आपली इच्छा व्यक्त करण्याचे धाडस आणि ती पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न या मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास अधोरेखित करणारा आहे.
आजच्या काळात लहान मुलांनी आपल्या गणेश मंडळाशी जोडलेली आस्था, एकजूट आणि उत्साह पाहायला मिळणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे. दत्तनगरमधील या चिमुकल्यांनी दाखवलेली इच्छाशक्ती आणि निरागस आग्रह यामुळे परिसरात त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
चिमुकल्यांच्या प्रेमाचा आणि आग्रहाचा मान ठेवत त्यांच्यात सहभागी होणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या भेटीमुळे गणेशोत्सवातील उत्साहाला आणखी रंगत आली.
