Sunday, September 20, 2026
Homeफलटणफलटणच्या पुरोगामी चळवळीचा खंदा योद्धा हरिष काकडे ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र...

फलटणच्या पुरोगामी चळवळीचा खंदा योद्धा हरिष काकडे ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन

वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष; सामाजिक समता, वाचन चळवळ आणि प्रबोधनासाठी केलेले कार्य ठरले दिशादर्शक

फलटण | प्रतिनिधी : फलटणच्या सामाजिक, पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे हरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सामाजिक आणि वैचारिक कार्याला विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. समाजातील वंचित, उपेक्षित, दलित तसेच भटक्या-विमुक्त घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नाना यांनी विविध सामाजिक, सहकारी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये पदे भूषविली; मात्र त्या पदांचा उपयोग त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजहितासाठी केल्याची आठवण आजही त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते.

हरिष काकडे यांचे बालपण सामाजिक वातावरणात गेले. प्राथमिक शिक्षण फलटण येथील शाळा क्रमांक २ मध्ये झाले. जंगम गुरुजी, कोळी गुरुजी तसेच ग. दा. काकडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थीदशेतच त्यांनी कलापथकातून सहभाग घेतला. पुढे मुंबईतील मराठा मंदिर आणि त्यानंतर मुधोजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून जयंती आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये विचार मांडण्यास त्यांनी सुरुवात केली. वडिलांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम, तसेच पी. आर. काकडे , अरुण काकडे, बबन पवार, संभाजी मोरे आदींचे मार्गदर्शन यामुळे त्यांच्या विचारविश्वाला आकार मिळाला. पी. आर. काकडे यांनी त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण केली. शिवाजी वाचनालयात घेऊन जाण्यापासून सामाजिक प्रबोधनाची पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करण्यापर्यंत त्यांनी नानांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

साहस क्रीडा मंडळातून कला, क्रीडा आणि समाजप्रबोधनाला चालना

सन १९७० मध्ये महात्मा फुले कामगार वसाहतीत वास्तव्यास आल्यानंतर नानांनी ‘साहस क्रीडा मंडळा’च्या माध्यमातून कला, क्रीडा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला सुरुवात केली. या मंडळाचा व्हॉलीबॉल संघ फलटण परिसरात प्रसिद्ध होता. अनेक स्पर्धांमध्ये या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. दास काकडे, दत्तात्रय गलीयल, मानसिंग भोसले, प्रकाश सोनू अहिवळे विठ्ठल पवार मधुकर माने भाऊ काकडे प्रभाकर गलीयल ,यांसारखे खेळाडू या उपक्रमाशी जोडले गेले.

यानंतर नानांनी महात्मा फुले वाचनालयाची स्थापना करून वाचन चळवळीला बळ दिले. वैचारिक साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.

१९७२ च्या दुष्काळात महिला मजुरांच्या प्रश्नासाठी पुढाकार

१९७२ च्या भीषण दुष्काळात रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला होता. फलटणमधील जिनिंग कंपनीत कापूस वेचण्याच्या मजुरीची संधी असतानाही मंगळवार पेठेतील महिलांना काम दिले जात नसल्याचे नानांच्या निदर्शनास आले. त्या वेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यवस्थापन आणि संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करून महिलांना मजुरीचे काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबांना रोजगार मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता.

१९७४ च्या दंगलीनंतर पुनर्वसनासाठी अथक पाठपुरावा

सन १९७४ मधील दंगलीच्या काळात परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली होती. अनेक कुटुंबांची घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली. या संकटाच्या काळात नाना डगमगले नाहीत. बाधित कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांचे संसार पुन्हा उभे राहावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

डॉ. कृष्णचंद्र भोईटे, वसंतराव नाईक आदींच्या माध्यमातून तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचविण्यात आला. तत्कालीन नियोजन राज्यमंत्री मोहन धारिया यांच्या माध्यमातून बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून कर्ज व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बाधित कुटुंबांना पुन्हा उभे करण्याच्या या प्रक्रियेत नानांनी सक्रिय भूमिका बजावली.

विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या प्रश्नांसाठी लढा

सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून नानांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काम केले. पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विभागीय बैठका घेतल्या. वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठविला.

नामांतराच्या आंदोलनातील लॉंगमार्चमध्येही त्यांचा सहभाग होता. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, रामनाथ चव्हाण, पार्थ पोकळे आणि अॅड. जी. बी. माने यांच्यासोबत त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर काम केले.

सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघात दीर्घकाळ कार्य

सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघाचे संचालक तसेच उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. सुमारे १७ वर्षे विविध सहकाऱ्यांसोबत त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून काम केले. सहकार क्षेत्रातील पदाचा उपयोग शेतकरी आणि सामान्य घटकांच्या हितासाठी करण्यावर त्यांनी भर दिला.

मागासवर्गीय सुधार महासंघाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी

सातारा जिल्हा मागासवर्गीय सुधार महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही नानांनी महत्त्वपूर्ण काम केले. पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तलाठी, वनरक्षक, महसूल, पाटबंधारे आदी विविध विभागांमध्ये पात्र उमेदवारांना संधी मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.

मंगळवार पेठेतील अनेक पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शिफारशी व प्रयत्न केल्याचे त्यांच्या कार्याच्या आठवणीत नमूद केले जाते.

महात्मा फुले विचार प्रसारक मंडळातून समाजप्रबोधन

सन १९७१ मध्ये महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाच्या कार्यात नानांचा सक्रिय सहभाग राहिला. अॅड. जी. बी. माने, बबनराव अडसूळ, बबनराव क्षीरसागर आदींच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता आणि बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ग. बा. सरदार आणि शंकरराव खरात यांसारख्या विचारवंतांना फलटणमध्ये आणण्यात नानांचा पुढाकार होता. व्याख्यानमाला, निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजप्रबोधनाला चालना दिली.

पुणे आकाशवाणीवरही विचार मांडण्याची संधी

नानांच्या प्रभावी वक्तृत्वाची दखल पुणे आकाशवाणी केंद्रानेही घेतली. ‘युवा वाणी’मधील ‘मला काय वाटते’ या सदरातून त्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. पुणे आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सुमारे आठ मिनिटे सामाजिक विषयांवर विचार व्यक्त केले.

लेखन क्षेत्रातही योगदान

सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या नानांनी दैनिक ‘मराठा’मध्येही लेखन केले. सामाजिक प्रश्नांवरील त्यांच्या लेखनाची दखल घेत त्यांचे कौतुक करण्यात आले. वाचन, चिंतन आणि लेखन या त्रिसूत्रीमुळे त्यांच्या विचारांना व्यापक सामाजिक संदर्भ मिळाला.

नगरसेवक म्हणून कामगार वसाहतीच्या विकासासाठी प्रयत्न

सन २००१ ते २००६ या कालावधीत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना महात्मा फुले कामगार वसाहतीतील मूलभूत सुविधांसाठी त्यांनी प्रयत्न केले. दोन समाजमंदिरांची उभारणी, सांडपाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते यांसारखी कामे त्यांच्या कार्यकाळात झाली. कामगार वसाहतीतील बुद्ध विहाराच्या उभारणीमागेही त्यांची प्रेरणा आणि पुढाकार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते.

विविध पदांचा उपयोग समाजहितासाठी

यशवंत सहकारी बँकेचे संचालक, सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य, जिल्हा एम्प्लॉयमेंट कमिटीतील काम तसेच जमीन वाटप समितीतील सहभाग अशा विविध जबाबदाऱ्या नानांनी सांभाळल्या. सामाजिक, सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील या पदांचा उपयोग समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.

फलटणमध्ये बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना आणून त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यातही नानांनी पुढाकार घेतला. नगरपालिका कामगारांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी प्रयत्न केले.

फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व

हरिष काकडे ‘नाना’ यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक समता, वाचन, प्रबोधन आणि वंचित घटकांच्या प्रश्नांशी जोडलेले होते. वैचारिक भूमिका आणि सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांनी तडजोड केली नाही. समाजातील मतभेद त्यांना अस्वस्थ करत; मात्र त्यावर संवाद आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर त्यांचा विश्वास होता.

त्यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक आणि पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचा कार्यकर्ता हरपला. त्यांच्या कार्याची आठवण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. सामाजिक समता, शिक्षण, वाचन आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले काम त्यांच्या स्मृतींना कायम जिवंत ठेवेल.

हरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या विचारांना, कार्याला आणि सामाजिक योगदानाला ‘साहस Times न्यूज पोर्टल’कडून विनम्र अभिवादन.

सोमीनाथ घोरपडे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments