दोन अज्ञात हल्लेखोरांकडून पाठलाग करून हत्या; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तपास सुरू
शिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास लाटेआळी, आंबेडकर नगर परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत हरी गंगावणे या तरुणाचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून डोक्यात गोळी झाडून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरी गंगावणे हा परिसरातून जात असताना दोन हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. काही क्षणांतच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी अवघ्या काही सेकंदांत हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले.
या संपूर्ण घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. तसेच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शिरूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
