कत्तलखाना सुरू ठेवण्याची मागणी; जाकीर कुरेशी यांचे प्रतिपादन — “येथे गोवंशाची हत्या होत नाही”
फलटण | प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर २०२६ फलटण नगर परिषदेच्या मालकीचा कुरेशी नगर (मंगळवार पेठ) येथील कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीवरून गेल्या काही दिवसांपासून शहरात आंदोलन सुरू असतानाच, कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्यास संबंधित व्यवसायिकांकडून आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कत्तलखाना बंद झाल्यास आपल्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगत जाकीर कुरेशी व इतर व्यवसायिकांनी प्रशासनासमोर आपली भूमिका मांडली आहे.
कुरेशी नगर येथील कत्तलखाना हा नगर परिषदेच्या मालकीचा असून, तेथे नियमांचे पालन करून व्यवसाय केला जात असल्याचा दावा व्यवसायिकांकडून करण्यात आला आहे. “या कत्तलखान्यात गोवंशाची हत्या होत नाही,” असे जाकीर कुरेशी यांनी स्पष्ट केले. कत्तलखान्याबाबत करण्यात येणारे आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कत्तलखाना अचानक बंद केल्यास त्यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिक व कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित व्यवसायिकांची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी गोरक्षक अक्षय तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. कत्तलखाना बंद करण्याची मागणी आणि व्यवसायिकांकडून करण्यात आलेला आत्मदहनाचा इशारा यामुळे फलटणमध्ये या विषयावरून वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची कायदेशीर व वस्तुनिष्ठ पद्धतीने चौकशी करून, कत्तलखान्यातील प्रत्यक्ष व्यवहार, परवानग्या तसेच नियमांचे पालन याबाबत स्पष्टता करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दोन्ही बाजूंच्या दाव्यांची प्रशासनाकडून पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
