Saturday, September 12, 2026
Homeफलटणगणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण टाळण्याचे फलटणमध्ये आवाहन

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण टाळण्याचे फलटणमध्ये आवाहन

२५ शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; अंनिसकडूनही पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश

फलटण | प्रतिनिधी. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण तसेच पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहन करण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. फलटण नगरपरिषद हद्दीतील तब्बल २५ शाळा व महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

विद्यार्थी, शिक्षक आणि संबंधित प्रतिनिधींच्या सहभागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत गणेशोत्सव काळात डीजेचा वापर टाळावा, ध्वनीची पातळी मर्यादित ठेवावी आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा संदेश देण्यात आला. विविध जनजागृतीपर घोषणांच्या माध्यमातून ‘ध्वनीप्रदूषणमुक्त फलटण’ करण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून तो इतरांना त्रास न देता साजरा करण्याची गरज आहे. विशेषतः मोठ्या आवाजातील डीजे, लाऊडस्पीकर आणि फटाक्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच आजारी व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे उत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा जिल्हा शाखेने देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर संदेश प्रसिद्ध केला आहे. समितीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा संदर्भ देत, “सण-उत्सव साजरे करूया; पण दुसऱ्याला त्रास न देता!” असा संदेश दिला आहे.

अंनिसच्या आवाहनानुसार रात्री १० नंतर लाऊडस्पीकर बंद ठेवणे, आवाज मर्यादित ठेवणे आणि फटाके टाळणे आवश्यक आहे. तसेच निर्माल्य नदी अथवा जलस्रोतांमध्ये न टाकता निर्माल्य कलशात जमा करावे, शाडूच्या मूर्तींचा वापर करावा आणि शक्य असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक रंग आणि फुलांची सजावट करण्याबरोबरच मिरवणुकीदरम्यान रस्ता अडवू नये, वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये आणि सर्व धर्मांचा सन्मान राखावा, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

“माझा आनंद दुसऱ्याच्या दुःखाचे कारण होणार नाही—हाच खरा उत्सव” हा संदेश गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी आचरणात आणल्यास उत्सव अधिक आनंददायी, पर्यावरणपूरक आणि सामाजिक सलोखा वाढविणारा ठरेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments