Friday, September 11, 2026
Homeफलटणधम्म जाणून घ्या, धम्म आचरणात आणा; दुःखातून बाहेर पडण्याचा हाच मार्ग :...

धम्म जाणून घ्या, धम्म आचरणात आणा; दुःखातून बाहेर पडण्याचा हाच मार्ग : पूज्य भंते कश्यप

कालकथित सचिन शंकर काकडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धम्मविधी व आदरांजली; आठवणींना उजाळा देताना उपस्थितांचे डोळे पाणावले

फलटण : कालकथित सचिन शंकर काकडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित धम्मविधी व आदरांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी पूज्य भंते कश्यप यांनी उपस्थितांना धम्म जाणून घेऊन तो आचरणात आणण्याचे आवाहन केले. काकडे सरांच्या पुण्यकर्मांचा आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख करून, त्यांच्या धम्मविचारांमुळे त्यांना सुगती प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबीयांनी दुःखात न राहता कालकथित सचिन शंकर काकडे यांच्या आठवणी, विचार आणि कार्य यांना स्मरणात ठेवून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही भंते कश्यप यांनी केले. स्मृतिदिनाच्या परंपरेमागील धम्मविचार स्पष्ट करताना त्यांनी राजा बिंबिसार यांनी तथागत भगवान बुद्ध व भिक्षुसंघाला केलेल्या भोजनदानाचा संदर्भ दिला. कुटुंबातील नातलग व जिवलग व्यक्तींचे स्मरण करून दान करण्याच्या परंपरेतून स्मृतिदिनाची संकल्पना विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.

तत्कालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निरगुडी आणि विद्यमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदल येथील शिक्षिका जयश्री कदम मॅडम व वसव मॅडम यांनी कालकथित सचिन शंकर काकडे सरांसोबत निरगुडी शाळेत काम करतानाच्या आठवणी साश्रू नयनांनी व्यक्त केल्या. त्यांच्या आठवणींमधून काकडे सरांचा विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले.

भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांनी अनित्यतेचे बुद्धतत्त्व स्पष्ट करताना पटाचारा यांच्या जीवनाचा दाखला दिला. त्यांनी तथागतांच्या धम्मतत्त्वांवर आधारित गीताचे भावपूर्ण सादरीकरण केले.

भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते सर यांनी संपूर्ण धम्मविधीचे संचलन केले. यावेळी त्यांनी धम्मप्रबोधनही केले.

कार्यक्रमास कालकथित सचिन शंकर काकडे यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक, माजी खासदार अमर साबळे, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे सर, निंबुत गावचे माजी सरपंच राजू बनसोडे तसेच भिमराव बनसोडे सर  भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे सर, तालुका व जिल्हा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे पदाधिकारी, कास्टट्राईब संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडीचे शिक्षक व विद्यार्थी, कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी कालकथित सचिन शंकर काकडे यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments