अकलूज : प्रतिनिधी — अकलूज परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपींनी गोंधळ घालत दोन महिला पोलिसांशी झटापट करून त्यांना मारहाण केली. पोलिसांची कारवाई लक्षात येताच आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांना अकलूज परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. पीएसआय सोनाली मोरे आणि पोलीस हवालदार अलका कदम यांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गर्भलिंग निदानासाठी येणाऱ्या महिलांना अकलूजमधील संग्रामनगर-नऊचारी परिसरातून वाहनाने घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार डमी ग्राहक म्हणून गेलेल्या दोन्ही महिला पोलिसांना आरोपींनी वाहनातून माण तालुक्यातील पळशी (म्हसवड) येथे नेले.
पळशी येथे गर्भलिंग निदान चाचणी करण्याची तयारी सुरू असतानाच आरोपींना संबंधित महिला पोलिस असल्याचा संशय आला. त्यानंतर आरोपींनी दोन्ही महिला पोलिसांशी झटापट करत त्यांना मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी परिसरात सापळा रचल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि गोंधळाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
सहा जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय
या प्रकरणी पोलीस हवालदार अलका कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नंदकुमार खाडे (रा. पळशी, ता. माण), नंदकुमार खाडे यांची आई, दोन अनोळखी पुरुष आणि दोन अनोळखी महिला यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके करीत आहेत.
गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या तसेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिला आहे.
गर्भलिंग निदानासारख्या गंभीर आणि कायद्याने प्रतिबंधित प्रकाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अकलूज परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सापळ्यातून आरोपी निसटले असले तरी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत असून, फरार आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
