कर्म सिद्धांतावर मार्गदर्शन; धम्ममित्र संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना वही वाटप

0
2
कर्म सिद्धांतावर मार्गदर्शन; धम्ममित्र संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना वही वाटप

रोकडे परिवाराकडून बालक सुक्रितच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रम

फलटण, दि. २ ऑगस्ट २०२६ : सोमवार पेठ, फलटण येथे अष्टमी निमित्त भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत या विषयावर वर्षावास प्रवचन मालिकेतील द्वितीय पुष्प तसेच आयु. सचिन रोकडे सर व आयुनि. शितल सचिन रोकडे यांच्या बालक आयु. सुक्रित सचिन रोकडे याचा प्रथम वाढदिवस उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना रोकडे परिवाराच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून वंदना घेण्यात आली. यावेळी धम्ममित्र संस्कार वर्ग, सोमवार पेठ येथील बालक-बालिकांना रोकडे परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आयुष्यमान चंद्रकांत महिंद्र मोहिते सर, केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य यांनी उपस्थित उपासक-उपासिका तसेच बालक-बालिकांना ‘भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच वर्षावास प्रवचन मालिकेचे महत्त्व स्पष्ट करताना धम्मविचार, शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून समाजाची पुढील पिढी घडविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

वही वाटपाच्या उपक्रमामागील शैक्षणिक भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे, त्यांना शिक्षणाचा ध्यास लावणे आणि त्यांच्या प्रयत्नांना पालकांनी प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. ‘मुलांच्या पाठीवर यशाची थाप दिली, तर हीच मुले निश्चितपणे उत्तम घडतील,’ असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची वाटचाल करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बालक सुक्रित सचिन रोकडे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा रोकडे परिवाराचा उपक्रम कौतुकास्पद ठरला. वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाची जोड देत ‘एक पाऊल शिक्षणासाठी’ हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास धम्म संस्कार वर्गाचे आयोजक आयु. विशाल शिंदे, आयु. विकी भोसले, आयु. प्रदीप खरात, आयु. हेमंत मदने, विकी भोसले परिवारातील सदस्य, रोकडे परिवारातील सदस्य तसेच धम्ममित्र संस्कार वर्गातील बालक-बालिका, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकी भोसले यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात संपन्न झाला.