धोम-बलकवडी धरणातील अतिरिक्त पाणी फलटणच्या दुष्काळी भागासाठी; पिण्याच्या पाण्यासह शेतीला मोठा दिलासा

0
4
धोम-बलकवडी धरणातील अतिरिक्त पाणी फलटणच्या दुष्काळी भागासाठी; पिण्याच्या पाण्यासह शेतीला मोठा दिलासा

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निर्णय; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

फलटण | प्रतिनिधी :- धोम-बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध झालेला अतिरिक्त पाणीसाठा फलटण तालुक्यातील दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त भागासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार तसेच आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या समस्येला दिलासा मिळण्याबरोबरच शेतीसाठी आवश्यक पाणीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

धरणातील अतिरिक्त पाणी नियोजनबद्ध पद्धतीने कालवे, ओढे व नैसर्गिक जलमार्गांद्वारे दुष्काळी पट्ट्यात सोडण्यात येत आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, तसेच विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याच्या उपलब्धतेतही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.