नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद; पालखी तळ स्वच्छतेसाठी गेल्या १० वर्षांपासून सामाजिक संस्थांचा आदर्श उपक्रम – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

0
7
नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद; पालखी तळ स्वच्छतेसाठी गेल्या १० वर्षांपासून सामाजिक संस्थांचा आदर्श उपक्रम – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण | प्रतिनिधी :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या पालखी तळाची स्वच्छता राखण्यासाठी फलटण नगरपरिषद, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता उपक्रमाचे श्रीमंत संजीवराजे यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, “नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीनंतर पालखी तळ परिसर पुन्हा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेतात. त्यांच्या या कार्याला विविध सामाजिक संस्थांची साथ लाभत असल्याने स्वच्छतेबाबत समाजात सकारात्मक संदेश जात आहे.”

ते पुढे म्हणाले की, “स्वच्छतेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पालखी तळ स्वच्छतेचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे.”

पालखी सोहळ्यानंतर परिसरातील कचरा संकलन, प्लास्टिक निर्मूलन, रस्त्यांची साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे. या उपक्रमात नगरपरिषदेचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व कर्मचारी, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांचे श्रीमंत संजीवराजे यांनी अभिनंदन करून भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांना सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.