Sunday, August 30, 2026
Homeफलटणश्रीराम कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू; सभासदांच्या बळावर गळीत हंगाम सुरू...

श्रीराम कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू; सभासदांच्या बळावर गळीत हंगाम सुरू करणार – आ. रामराजे नाईक-निंबाळकर

श्रीराम कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू; सभासदांच्या बळावर गळीत हंगाम सुरू करणार – आ. रामराजे नाईक-निंबाळकर

फलटण | प्रतिनिधी.  स्थानिक विरोधकांकडून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीला किंवा षडयंत्राला बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. सभासदांच्या विश्वासाच्या आणि एकजुटीच्या बळावर श्रीराम सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करून येणारा गळीत हंगाम कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, संचालक मंडळाचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी बहुमताने श्री दत्त इंडिया साखर कारखान्यासोबत भागीदारी तत्त्वावर कारखाना चालविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित राहिला असून त्यामुळे आगामी गळीत हंगामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

यावेळी त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवून जवाहर समूहावर दबाव आणण्याचा, भागीदारीचा करार मोडण्याचा आणि श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहीजण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि त्यांच्या कारखान्यांना फायदा व्हावा यासाठी श्रीराम कारखान्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहेत. मात्र, सभासद हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, राजकीय नेत्यांच्या किंवा सत्तेच्या आधारावर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याऐवजी त्यांनी थेट जनतेसमोर यावे. श्रीराम हा सभासदांचा कारखाना असून तो सभासदांच्या बळावरच पुन्हा उभा राहणार आहे.

रामराजे यांनी सांगितले की, अलीकडेच झालेल्या सभासद मेळाव्यानंतर भागभांडवल उभारणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत सुमारे एक कोटी रुपयांचे शेअर भांडवल जमा झाले असून कारखाना कार्यालयात दररोज सभासदांची मोठी गर्दी होत आहे. हा प्रतिसाद सभासदांचा कारखान्यावरील दृढ विश्वास दर्शवणारा आहे.

सभासदांनी शेअर्सची रक्कम पूर्ण करावी, आवश्यक आर्थिक पाठबळ उभे करण्याची जबाबदारी माझी आहे. वित्तीय संस्थांशी चर्चा करून निधी उपलब्ध केला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत येणारा गळीत हंगाम सुरू केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनीही शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, सहकार मंत्री, सहकार आयुक्त आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून कारखान्याबाबत सकारात्मक भूमिका दिसून येत आहे. शासनाने एकाच बैठकीत तीन साखर कारखान्यांबाबत निर्णय घेतला. त्यापैकी इतर दोन कारखान्यांना तातडीने आदेश देण्यात आले, मात्र श्रीराम कारखान्याचा निर्णय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

कारखाना सुरू करण्यासाठी कोणतीही तांत्रिक अथवा कायदेशीर अडचण नसतानाही निर्णय लांबवला जात असून, यामागे स्थानिक विरोधकांकडून करण्यात आलेला पत्रव्यवहार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोपही डॉ. शेंडे यांनी केला.

दरम्यान, शासनस्तरावरील निर्णयाची प्रतीक्षा सुरू असली तरी सभासदांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि वेगाने होत असलेली भागभांडवल उभारणी पाहता, “आपला कारखाना आपणच उभा करायचा” हा निर्धार अधिक मजबूत होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments