
बेलसरजवळ पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकरी ठार, चार गंभीर जखमी
सासवड | प्रतिनिधी :
आषाढी वारीदरम्यान सासवडहून जेजुरीच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ, शिपदीप लॉजिंगसमोर पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना एका ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी सात महिला वारकरी रस्त्याने पायी जात असताना ट्रकने त्यांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमी महिला वारकऱ्यांना जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.










