Sunday, August 23, 2026
Homeसाताराकास्ट्राईब शिक्षक संघटनेचे ९ जुलैच्या 'शाळा बंद' आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे ९ जुलैच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

म्हसवड | प्रतिनिधी :- शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गुरुवार, दि. ९ जुलै रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चामध्ये सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय दिनकर खरात, अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा सातारा यांनी म्हसवड येथे सांगितले 

यावेळी बोलताना संजय खरात म्हणाले की, राज्यातील शिक्षकांवर अन्यायकारक निर्णय लादले जात असून शिक्षण व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. अन्यायकारक TET परीक्षा, पदोन्नतीतील अटी व सेवाज्येष्ठतेचा प्रश्न, संच मान्यता धोरण, वाढता ऑनलाइन कामांचा बोजा, बीएलओ (BLO) कामाची सक्ती तसेच १५ पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा प्रस्ताव या सर्व मुद्द्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षकांना शैक्षणिक कामासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि शिक्षण व्यवस्था सक्षम राहावी यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शिक्षक संघटना तसेच पालकांनी गट-तट विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत “शिक्षक व शिक्षण वाचविण्यासाठी एकजूट आवश्यक आहे,” असेही संजय दिनकर खरात यांनी सांगितले.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सामूहिक रजा घेऊन सातारा येथे होणाऱ्या ‘शाळा बंद’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments