Friday, August 21, 2026
Homeफलटणसहकारी संस्थांच्या कारभारावरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा श्रीमंत रामराजे व त्यांच्या भावंडांवर...

सहकारी संस्थांच्या कारभारावरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा श्रीमंत रामराजे व त्यांच्या भावंडांवर घणाघाती हल्लाबोल

फलटण | प्रतिनिधी :  फलटण तालुक्यातील सहकारी संस्थांच्या सद्यस्थितीवरून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या भावंडांवर अत्यंत जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. सहकार क्षेत्रातील अनेक संस्था अकार्यक्षम कारभारामुळे डबघाईला आल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, तालुक्यातील सहकारी संस्थांना रामराजे व त्यांच्या भावंडांचा मोठा शाप लागला आहे. ही अशी कीड आहे की, ती सहकारी संस्थांना दिवसेंदिवस पोखरत असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. स्वतः संस्था चालविण्याची क्षमता नसल्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखाना, मालोजी बँक, डेअरी यांसारख्या संस्था भाड्याने देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
कारखान्याच्या भाडेकरारावर गंभीर आरोप
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भाडेकरारावर बोलताना त्यांनी सांगितले की, जगात असा एकमेव कारखाना असेल ज्याचे भाडे काळानुसार वाढण्याऐवजी सतत कमी होत गेले. भाड्यात वाढ होणे अपेक्षित असताना प्रत्येक टनामागे २०० रुपयांची खाबुगिरी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांनी स्पष्ट केले की, कारखाना एखाद्या सहकारी संस्थेला चालविण्यास दिल्यास त्याला विरोध नाही; मात्र कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचे खाजगीकरण होऊ देणार नाही. अशा कोणत्याही प्रयत्नाला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
स्वराज’ कारखान्याच्या यशामुळे विरोधक अस्वस्थ
उपळवे येथील स्वराज साखर कारखान्याचा उल्लेख करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, हा कारखाना कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीवर उभा राहिलेला नसून स्वतःच्या कष्टातून उभारण्यात आला आहे. आज फलटण तालुक्यात सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून स्वराजची ओळख निर्माण झाली असून, हीच प्रगती काहींना खटकत असल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, स्वराज कारखान्याकडे कोणत्याही शेतकऱ्याचे देयक थकीत नाही आणि भविष्यातही राहणार नाही. जर देयके थकीत असती तर जनता कधीच त्यांना स्वीकारली नसती, असेही त्यांनी नमूद केले.
१२४ कोटींच्या भुयारी गटार योजनेचा हिशोब मागितला
नगराध्यक्षांवर १५ टक्के कमिशनचे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, फलटण शहरासाठी मंजूर झालेल्या १२४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे नेमके काय झाले, याचा आधी खुलासा करावा. त्यानंतरच इतरांवर आरोप करावेत, असे त्यांनी म्हटले.
श्रीराम कारखान्याच्या बंद पडण्यामागील इतिहासाचा उल्लेख
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अधोगतीबाबत बोलताना त्यांनी आरोप केला की, झोनबंदी उठविण्याच्या निर्णयामुळे कारखाना बंद पडण्याची वेळ आली. या संपूर्ण घटनाक्रमामुळे निर्माण झालेल्या तणावात कै. हणमंतराव पवार यांचे निधन झाल्याचा उल्लेख करत त्यांनी हा इतिहास जनता विसरणार नसल्याचे सांगितले.
रोजगारात घराणेशाहीचा आरोप
तालुक्यातील बेरोजगार युवकांवर अन्याय झाल्याचा आरोप करताना त्यांनी म्हटले की, महिंद्रा प्रकल्पात स्वतःच्या मुलाला आणि कमिन्स कंपनीत स्वतःच्या मुलीला प्रथम रोजगार देण्यात आला. स्थानिक तरुणांवर अन्याय करून घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
फलटणचा विकास थांबणार नाही”
भाषणाच्या शेवटी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी फलटणचा विकास थांबणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. फलटण तालुक्याला राज्यातील सर्वाधिक प्रगत तालुक्यांपैकी एक बनविण्यासाठी जनता आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments