Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशबौद्ध समाजातील तरुणांनी सावरण्याची गरज; व्यसन, भीती आणि सामाजिक उदासीनतेवर विजय लोंढे...

बौद्ध समाजातील तरुणांनी सावरण्याची गरज; व्यसन, भीती आणि सामाजिक उदासीनतेवर विजय लोंढे यांचे परखड मत

फलटण | प्रतिनिधी बौद्ध समाजातील सुशिक्षित तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत असून, काही प्रमाणात तिला जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गावर ढकलले जात असल्याची खंत सामाजिक अभ्यासक विजय बायडाबाई जनार्दन लोंढे यांनी व्यक्त केली आहे. व्यसनाधीनता, सामाजिक भीती आणि अपराधीपणाची भावना यामुळे तरुणांमध्ये अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची क्षमता कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोंढे म्हणाले की, आज अनेक तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. काही गंभीर सामाजिक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, तरुणांच्या मनात अपराधीपणाची भावना आणि कायद्याची भीती निर्माण केली जात आहे. या मानसिक दबावामुळे अनेक तरुण अन्याय आणि अत्याचार दिसत असूनही त्याविरोधात उभे राहण्याचे धाडस करू शकत नाहीत.

त्यांच्या मते, एकदा अपराधी भावना मनात घर करून बसली की तरुण आत्मविश्वास गमावतो आणि समाजापासून दुरावत जातो. अशा तरुणांकडे समाज अनेकदा संशयाने किंवा कुत्सित नजरेने पाहतो. त्यामुळे त्यांची मानसिक घुसमट आणखी वाढते आणि ते मुख्य प्रवाहापासून दूर जातात.

तरुण पिढी घडविण्यात केवळ पालकच नव्हे, तर संपूर्ण समाजाचीही तितकीच मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलाने व्यसनाधीन व्हावे किंवा चुकीच्या मार्गावर जावे असे वाटत नाही. मात्र समाजातील वातावरण, संगत आणि सामाजिक संस्कार यांचा तरुणांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडतो,” असे त्यांनी सांगितले.

समाज हा तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत असावा. सकारात्मक विचार, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून तरुणांनी स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहनही विजय लोंढे यांनी केले. तरुण ही समाजाची खरी ताकद असून, त्यांच्याकडे पाहूनच समाजाची दिशा आणि दशा ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

समाजातील प्रत्येक घटकाने भरकटलेल्या तरुणांना दोष देण्याऐवजी त्यांना योग्य मार्गदर्शन, आधार आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून दिल्यास सक्षम, जागरूक आणि जबाबदार पिढी घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

✍️ — विजय बायडाबाई जनार्दन लोंढे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments